सातारा – कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या कालावधीत बंद करण्यात आलेली महावितरणची वीज बिल भरणा केंद्रे टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहेत. सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 435 पैकी 354 वीज बिल भरणा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. करोना प्रतिबंधित क्षेत्र वगळता उर्वरित केंद्रे येत्या काही दिवसांत सुरू होणार आहेत, अशी माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.
लॉकडाऊनच्या कालावधीत वीज बिल भरणा केंद्रे बंद करण्यात आली होती. मीटर रीडिंग व कागदी वीज बिलांचे वितरण 23 मार्चपासून बंद करण्यात आल्याने ग्राहकांना मासिक वीज वापराएवढी सरासरी वीज बिले मोबाइलवर एसएमएसद्वारे व ऑनलाइन देण्यात येत आहेत. ग्राहकांना पाठविण्यात आलेली सरासरी वीज बिले भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वीजग्राहक व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची वैयक्तिक व सार्वजनिक स्वरूपात काळजी घेऊन वीज बिल भरणा केंद्रे सुरू करण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने महावितरणला दिली आहे. ही काळजी घेऊन महावितरणच्या कराड विभागात 123 पैकी 96, फलटण विभागात 74 पैकी 60, सातारा विभागात 102 पैकी 93, वडूज विभागात 57 पैकी सर्व 57 आणि वाई विभागात 61 पैकी 48 वीज बिल भरणा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
यामध्ये महावितरण, जिल्हा बॅंक व इतर सहकारी बॅंका व पतसंस्थांकडून चालविण्यात येणाऱ्या अधिकृत वीज बिल भरणा केंद्रांचा समावेश आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळणे व सॅनिटायझरची उपलब्ध करून देण्याबाबत केंद्रचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. वीजग्राहकांना पाठविण्यात आलेल्या एसएमएसद्वारे किंवा केवळ ग्राहक क्रमांकाच्या आधारे वीज बिले भरून घेण्याची सूचना केंद्रचालकांना देण्यात आली आहे.
वीज बिल उपलब्ध नसल्यास ग्राहकांनी या केंद्रात एसएमएस किंवा जुने वीज बिल दाखवावे. तेसुद्धा उपलब्ध नसल्यास फक्त ग्राहक क्रमांक सांगितला तरी बिलाची रक्कम भरण्याची सोय उपलब्ध आहे. ग्राहकांनी थकबाकीसह चालू वीज बिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. घरबसल्या वीज बिल भरण्यासाठी महावितरणची वेबसाईटुुु.ारहरवळीलो.ळप, मोबाइल ऍप व इतर पर्यायांद्वारे ऑनलाइन सोय उपलब्ध आहे.