नवी दिल्ली- एका खासगी विमान कंपनीच्या वैमानिकाला लुटल्याच्या कारणावरून दिल्ली पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. पण त्यांच्यावर करण्यात आलेली कारवाई पोलिसांना चांगलीच महागात पडली आहे. कारण या पाच जणांपैकी एक जण करोना बाधित असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्या संपर्कात असलेल्या दहा पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
या आरोपींपैकी एकाला पोलीस कोठडीत असतानाच उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याच्यात करोनाची लक्षणे दिसून आली. त्यानुसार त्याची करोना टेस्ट केल्यानंतर तो करोना पॉझिटिव्ह निघला. त्यानंतर मात्र पोलिसांचीच पळापळ सुरू झाली.
या आरोपींनी वैमानिकाला लुटण्याचा प्रकार 2 व 3 जूनच्या रात्री झाला होता. तो फरीदाबादहून कॅबने इंदिरा गांधी विमान तळावर जात असताना त्याला एका फ्लायओव्हरवर बंदुकीचा धाक दाखवून लुटण्यात आले. त्यातील आरोपींना पोलिसांनी तपास करून पकडले होते.