राहाता – राहाता शहरातील पहिल्या करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 31 जणांना क्वारंटाइन केले होते. त्यापैकी तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे राहात्यात एकाच दिवशी तीन करोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तसेच 28 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. राहाता शहरात एकाच दिवशी तीन करोनाबाधित आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
आज सापडलेले तिन्ही बाधित व्यक्ती या कन्टोन्मेंट झोनमधील आहेत.
हे तिनही पुरुष राहात्यातील पहिल्या करोनाबाधिताच्या संपर्कात आले होते. या तिघांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने या तिघांच्या घरी जाऊन त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच त्यांच्या कुटुंबियांना शिर्डी येथील कोविड केअर सेंटरमध्ये नेऊन त्यांची तपासणी करून क्वारंटाईन करण्यात येणार आहे. त्यांचा स्वॅब नगर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येण्याची शक्यता आहे. शहरात आता करोनाबाधितांची संख्या चारवर गेली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, शहरातील बाजारपेठ काही दिवस लॉकडाऊन ठेवावी, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
दरम्यान आज आढळून आलेल्या तीन करोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात असलेल्या अनेकांचे धाबे दणाणून गेले आहे. राहाता शहरात आता नागरिकांनी सतर्क राहणे व करोना विषयी सर्व नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा करोनाचे पाय राहाता शहरात पसरण्यास वेळ लागणार नाही. नागरिकांनी घाबरून न जाता दिलेल्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन प्रशासन व नगरपरिषदेच्या वतीने करण्यात
आले आहे.
संपर्कात येणाऱ्यांची संख्या मोठी ?
राहाता शहरात आढळलेल्या करोनाबाधितांशी नेमका कोणाचा, कुठे संपर्क झाला, हाच प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र शहरात मोठ्या प्रमाणात जुगारांचे डाव रंगत होते. या ठिकाणीच हा संपर्क झालेला असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींची संख्या मोठी असण्याची शक्यता आहे.