पुणे बार असो. केलेल्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद
पुणे(प्रतिनिधी) – शिवाजीनगर न्यायालयातील दुसऱ्या दिवशी कमी गर्दी झाली. “काम असेल तरच न्यायालयात या’ अशा स्वरूपाच्या पुणे बार असोसिएशनने केलेल्या आवाहनास वकील, पक्षकारांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे पहिल्या दिवसाच्या तुलनेत निम्मीच लोक आल्याचे पाहायला मिळाले.
करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे दोन महिन्याहून अधिक काळापासून न्यायालय बंद होते. केवळ सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत महत्त्वाच्य प्रकरणांची सुनावणी होत होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार योग्य त्या उपाययोजना करून सकाळी 10 ते दुपारी 1 आणि दुपारी 2.30 ते 5.30 या दोन सत्रांमध्ये न्यायलय सुरू राहणार आहे.
“उद्या कोणते न्यायाधीश सुनवणीसाठी न्यायालयात असणार आहेत. याबाबतच्या ऍपची माहिती व्हॉट्सवर वकिलांना देण्यात येत आहे. तेथे कोणत्या प्रकरणाची कधी सुनावणी आहे, हे कळते. त्यामुळे वकील, पक्षकारांची गर्दी कमी होण्यास मदत झाली.
-अॅड. घनश्याम दराडे, सचिव, पुणे बार असोसिएशन.
निकालावर असलेल्या, गुन्ह्यातून वगळण्याच्या आणि जामीन प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. मात्र, सोमवारी (दि.8) पहिल्या दिवशी नियमित न्यायालय सुरू झाले, असा समज करून आणि लॉकडाऊननंतरच्या उत्सुकतेमुळे वकील, पक्षकारांनी गर्दी केली होती.
वास्तविक पाहाता न्यायालय अंशत: सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर बारकडून केलेल्या आवाहनानुसार कमी गर्दी झाली आणि आवश्यक असलेले वकील, पक्षकारच न्यायालयात आले. उद्या, परवा ही गर्दी आणखी कमी होईल, असे अध्यक्ष अॅड. सतिश मुळीक यांनी सांगितले.