पिंपरी (प्रतिनिधी) – शहरातील करोनाबाधित रुग्णसंख्येने सातशेचा टप्पा ओलांडला आहे. आज शहरातील 30 जणांना करोनाची बाधा झाली. तर शहराबाहेरील 8 रुग्णांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे शहरातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 708 झाली आहे. आंबेगाव येथील 64 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आज शहरातील आनंदनगर, पिंपळे गुरव, बौध्दनगर, सांगवी, भाटनगर, बॉईज हॉस्टेल वायसीएम, अजिंठानगर, गुरुदत्तनगर पिंपरी, लिंकरोड पिंपरी, रुपीनगर, वाकड, चिंचवड, आनदपार्क, निगडी, खऱाळवाडी, दापोडी येथील 30 जणांना करोनाची लागण झाली. यामध्ये 18 पुरुष व 12 महिलांचा समावेश आहे. तर शहराबाहेरील 8 पुरुषांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजपर्यंत शहरातील 708 जणांना करोनाची लागण झाली आहे. सद्यस्थितीत शहराबाहेरील 46 व शहरातील 251 अशा 297 सक्रीय रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम व भोसरी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान आज दिवसभरात 36 रुग्णांना घरी सोडण्यात आले. तर दिवसभरात 206 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यासह गेल्या दोन दिवसांतील 261 जणांचे तपासणी अहवाल येणे अद्याप बाकी आहेत.
जिल्हा रुग्णालयः आणखी दोन करोनाबाधित
सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात शनिवारी (दि. 6) आणखी दोन करोना बाधित रुग्णांची भर पडली. औंध आणि नाना पेठ (पुणे) येथील हे रुग्ण आहेत. औंध-आंबेडकर वसाहत येथील 60 वर्षीय पुरुष आणि नाना पेठ (पुणे) येथील 72 वर्षीय महिलेचा त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे करोना बाधित रुग्णांचा आकडा 147 पर्यंत जाऊन पोहचला आहे. रुग्णालयामध्ये आज 8 संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. 36 रुग्ण आत्तापर्यंत करोनामुक्त झाले आहेत. त्यांना घरी सोडले आहे. सध्या 26 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 9 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 73 जणांना अन्य रुग्णालयात हलविले आहे. तर, 12 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.