कोपरगाव -मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत कोपरगाव विधानसभा मतदार संघातील रस्त्यांची कामे करण्यासाठी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी तत्कालीन सरकारच्या माध्यमातून मोठा निधी आणला. त्यामुळे विविध रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून, काही प्रगतिपथावर आहेत. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून एक रुपयाचाही निधी मतदारसंघात आला नसल्याची खंत भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी व्यक्त केली.
रोहोम म्हणाले, ग्रामीण भागातील दळणवळण सुकर होण्याच्या दृष्टीने सन 2014 ते 2019 या कार्यकालात तत्कालीन सरकारने मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ही महत्त्वाकांक्षी योजना आणून खेड्यांचे दळणवळण खऱ्या अर्थाने सुरळीत करण्याचे काम केले. या योजनेअंतर्गत कोपरगाव विधानसभा मतदारसंघासाठी निधी मिळावा म्हणून कोल्हे यांनी सातत्याने पाठपुरावा करून 22 रस्त्यांसाठी सुमारे 53 कोटी 75 लाख 41 हजार रुपयांचा निधी आणला. या योजनेतील पाच रस्त्यांची कामे पूर्ण असून, उर्वरित 17 रस्त्यांची कामे प्रगतिपथावर आहेत.
सरकारच्या कालावधीत सुरू करण्यात आलेल्या या योजनेमुळे ग्रामीण भागातील दळणवळणाची सोय झाल्याने खेडी एकमेकांना जोडली गेली. या निधीतून जेऊर पाटोदा-चांदगव्हाण-मुर्शतपूर-धारणगाव-सोनारी ते रवंदे, टाकळी-ब्राम्हणगाव ते नाटेगाव, अंचलगाव ते ओगदी, राहाता तालुक्यातील रामपूरवाडी ते एकरुखे आणि संवत्सर (कान्हेगाव फाटा) ते भोजडे- धोत्रे-तळेगाव मळे या रस्त्यांची कामे पूर्ण झाली. एमडीआर आठ ते लीलावाडी (सौतानवाडी), रवंदे हनुमानवाडी ते मळेगाव थडी, कासली-गोधेगाव-घोयेगाव ते वाकचौरे वस्ती आणि राहाता तालुक्यातील वाकडी ते धनगरवाडी या रस्त्यांची कामे प्रगतिपथावर आहे.
त्याचप्रमाणे या योजनेतून मंजूर झालेली रामा सात ते मढी खुर्द, चासनळी ते दहिवाडी, रामा 65 ते करंजी, रामा 65 तिळवणी ते आपेगाव, रामा 36 ते सडे, प्ररामा 12 ते जेऊरकुंभारी, प्ररामा 12 ते डाऊच खुर्द, प्रजिमा 4 ते सांगवी भुसार, इजिमा 11 कोळपेवाडी ते कोळगाव थडी, प्ररामा आठ ते कोकमठाण (श्यामवाडी) रामा 7 ते वेळापूर (पगारे वस्ती), रांजणगाव देशमुख ते कोऱ्हाळे, राहाता तालुक्यातील जळगाव ते चितळी रस्ता कामांसाठीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तेंव्हा सदरची कामे तातडीने सुरु करावीत, अशी मागणी रोहोम यांनी केली आहे.