पुणे – तब्बल दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर शहर आता पूर्वपदावर येत आहे. योग्य ती काळजी घेत आता पुणेकरांचे व्यवहार सुरळीत होत असल्याची चिन्हे आहेत. काही मुख्य रस्त्यांवरील ‘बॅरिकेट्स’ हटवल्याने शनिवारी ठिकठिकाणी गर्दी दिसून आली. शिवाय रस्त्यांवर वाहनांची संख्या चांगलीच वाढली होती.
खासगी-सरकारी कार्यालये, व्यवसाय, खरेदी आदीचे निमित्त साधत पुणेकरांनी आपली घराबाहेर पडल्यास सुरूवात केली आहे. निर्बंध शिथिल केलेल्या भागांच्या बरोबरीने प्रतिबंधित क्षेत्रातील अनेक वाहनचालकांनी शनिवारी गर्दी केली. परवानगी नसताना एका गाडीवर दोन जण प्रवास करत होते. अनेक ठिकाणी बेशिस्त उभ्या केलेल्या गाड्या, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालक वाहतूक शाखेकडून कारवाई करण्यात आली.
लक्ष्मी रस्त्यावरील पार्किंग फुल्ल
नेहमी गजबजलेल्या लक्ष्मी रस्त्यावरचे पार्किंग दोन महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा “फुल्ल’ झाल्याचे चित्र होते. रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी आणि चारचाकी गाड्या उभ्या केल्या होत्या. यातील बहुतांश वाहने व्यापारी, कर्मचाऱ्यांची असतात. त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर पुणेकरांना लक्ष्मी रस्त्यावरील अपुऱ्या पार्किंगचा सामना करावा लागणार आहे.