कराड -सातारा जिल्हा नॉन रेड झोनमध्ये समाविष्ट झाला आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रे (कंटेन्मेंट झोन) वगळून जिल्ह्यातील सर्व व्यक्तींच्या हालचाली सर्व वैयक्तिक व सार्वजनिक वाहतुकीस परवानगी दिली आहे. यामध्ये दुचाकी वाहनावर 1 चालक, तीन चाकीवर 1+2 व्यक्ती, चार चाकी वाहनात 1+2 व्यक्तींचा समावेश आहे. मात्र, कराड शहरात अनेकजण दुचाकीवर डबल-टिबल सीट प्रवास करताना आढळून आल्याने पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली आहे.
सातारा जिल्ह्यात करोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कडक निर्बध लागू केले होते. मात्र, लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात सातारा जिल्हा नॉन रेड झोनमध्ये सामाविष्ठ झाला आहे. त्यामुळे कंटेनमेंट झोन वगळता जिल्ह्यातील उद्योग धंद्ये सुरू करण्यास अटीशर्तीवर परवानगी देण्यात आली आहे.
लॉकडाऊनमध्ये शिथीलता आली असलीतरी सर्व शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इन्स्टिटयूट हॉटेल, रेस्टॉरंट, स्पा. इतर हॉस्पिटीलिटी सेवा तसेच चित्रपट गृहे, शॉपिंग मॉल, जिम, स्विमींग पुल, एंटरटेंमेंट पार्क, बार्सन्ड, ऑडिटोरियम, असेंबली हॉल, मंगल कार्यालय हे सर्व बंद राहणार आहेत. सर्व सामाजिक, राजकीय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर मेळावे व मोठया संख्येने लोक जमा होतील, असे कार्यकम बंद राहणार असून धार्मिक स्थळेही सुरू होणार नाहीत.
याशिवाय सर्व वैयक्तिक व सार्वजनिक वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये दुचाकी वाहनावर 1 चालक, तीनचाकीवर 1+2 व्यक्ती, चार चाकी वाहनात 1+2 व्यक्तींना प्रवास करता येणार आहे. मात्र, लॉकडाऊन शिथील होताच जणू काय आत सर्व पहिल्याप्रमाणे सुरू झाले अशा आर्विभाव एक दुचाकीवर दोनजण तीनजण बसून प्रवास करताना आढळून आले. या पार्श्वभूमीवर कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखाने कारवाईचा बगडा उगारला.
शहरातील कोल्हापूर नाका, भेदाचौक, दत्तचौक, चावडी चौक आदी गर्दीच्या ठिकाणी दुचाकीवरून एक पेक्षा जास्त प्रवास करणाऱ्यांवर कारवाई केली. ही कारवाई जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास अथवा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती बी. आर. पाटील यांनी दिली. तसेच प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे नियमांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.