महाराष्ट्रातून परतलेल्यांमुळे केरळमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत उच्चांकी वाढ

थिरूवनंतपूरम: केरळमध्ये शुक्रवारी 42 नवे करोनाबाधित आढळले. त्या राज्यात एवढ्या प्रमाणात एकाच दिवशी बाधित आढळण्याचा तो उच्चांक ठरला. नव्याने आढळलेल्या बाधितांपैकी निम्मे नुकतेच महाराष्ट्रातून परतले आहेत.

देशातील पहिले तीन करोनाबाधित केरळमध्ये आढळले. मात्र, त्यानंतर त्या राज्याने करोना फैलाव नियंत्रणात ठेवण्यात लक्षणीय यश मिळवले. त्याबद्दल केरळचे कौतुक होत असतानाच मागील काही दिवसांत त्या राज्यातील करोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. अर्थात, त्या घडामोडीला इतर राज्यांतून आणि परदेशांतून येणाऱ्यांची घरवापसी कारणीभूत ठरली आहे. केरळमध्ये शुक्रवारी आढळलेल्या बाधितांपैकी 21 जण महाराष्ट्रातून परतलेले आहेत.

तर 17 बाधित परदेशांतून आल्याचे स्पष्ट झाले. आंध्र प्रदेश आणि तामीळनाडूतून आलेल्या प्रत्येकी एकाला करोनाची लागण झाली. नव्या बाधितांमध्ये केरळबाहेर प्रवास न केलेल्या दोघांचा समावेश आहे. आता केरळमधील एकूण करोनाबाधितांची संख्या 732 इतकी झाली आहे.

त्यातील 512 बाधित याआधीच करोनामुक्त झाले आहेत. केरळमध्ये आतापर्यंत करोनामुळे केवळ चौघे बाधित दगावले आहेत. त्यामध्ये गुरूवारी निधन झालेल्या 73 वर्षीय वृद्धेचा समावेश आहे. ती वृद्ध महिलाही महाराष्ट्रातून केरळमध्ये परतली होती.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×