जुन्नर/ ओतूर – माळशेज घाटाच्या अलीकडे पिंपळगाव जोगा धरणाच्या बॅकवॉटर भिंतीशेजारील खड्ड्यात भरधाव वेगाने जाणारी फॉर्च्युनर गाडी कोसळून दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि.19) रात्री उशिरा घडली आहे. नगर-कल्याण मार्गावरील खुबी फाट्याहून खिरेश्वरकडे जाणाऱ्या या वाहनात पाचजण होते.
जागांची खरेदी-विक्री करणारे सत्यवान ऊर्फ धर्मा मच्छिंद्र पानसरे (रा. घाटघर, रा. जुन्नर) आणि घाटकोपर येथील उत्तम मारुती घोडेकर यांचा मृत्यू झाला आहे. तर सईबाई मारुती घोडेकर (वय 60), रुपाली उत्तम घोडेकर (वय 45), चेतन उत्तम घोडेकर (वय 16) हे तीनजण जखमी झाले आहेत. माळशेज घाटातील चेक पोस्टवर ही फॉर्च्युनर गाडी (एमएच 04- जीएम 201) न थांबताच पुढे गेली. आडवाटेने पळ काढण्याच्या घाईत हा अपघात झाला असावा, अशी चर्चा सुरू आहे. मृत्यू झालेल्या दोघांची उत्तरीय तपासणीसाठी ओतूर रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
सामान्य ते आलिशान जीवनशैलीचा अंत
मंगळवारी (दि. 19) एका जागेच्या व्यवहारासंदर्भात पानसरे व त्याचे सहकारी मढ परिसरात गेले होते. अपघातग्रस्त गाडीमध्ये लाखोंची रोकड असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये होती. किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या कुसूर गावांत शिक्षण घेतलेल्या या युवकाचा सामान्य ते आलिशान जीवनशैलीपर्यंतचा प्रवास एखाद्या चित्रपटातील कथेसारखा होता.