पॅरिस: तूर्त करोना संकट टळण्याची चिन्हे नसून जगभरातील बाधितांची संख्या आता 50 लाखांवर गेली आहे. तब्बल 213 देश आणि प्रदेशांमध्ये फैलावलेल्या विषाणूने आतापर्यंत जगभरात 3 लाख 25 हजारांहून अधिक बाधितांचा बळी घेतला आहे.
करोनाने सर्वांधिक कहर अमेरिकेत केला आहे. त्या देशातील बाधितांची संख्या 15 लाखांपेक्षा अधिक आहे. अमेरिकेत करोना संसर्गामुळे 93 हजारांहून अधिक बाधित दगावले आहेत. रशियातील बाधितांच्या संख्येने 3 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तो देश बाधितांच्या संख्येत जागतिक क्रमवारीत अमेरिकेपाठोपाठ दुसऱ्या स्थानी आहे. स्पेन आणि ब्राझीलमधील बाधितांची संख्या प्रत्येकी पावणे तीन लाखांच्या घरात आहे. करोनाने ब्रिटनमध्ये 35 हजार तर इटलीत 32 हजारपेक्षा अधिक बळी घेतले आहेत. फ्रान्स आणि स्पेनमधील मृतांचा आकडा 28 हजारांच्या घरात आहे. तर ब्राझीलमध्ये जवळपास 18 हजार बाधित दगावले आहेत.
आता भारतापाठोपाठ पेरू या देशानेही बाधितांच्या संख्येत चीनला मागे टाकले आहे. सर्वप्रथम करोनाचा उद्रेक झालेल्या चीनमधील बाधितांची संख्या 83 हजारांच्या घरात स्थिरावली आहे. तो देश बाधितांच्या संख्येत जागतिक क्रमवारीत 13 व्या स्थानी ढकलला गेला आहे. याआधीच 1 लाखाचा टप्पा पार करणारा भारत 11 व्या स्थानी आहे. तर बाधितांची संख्या लाखाच्या घरात पोहचलेला पेरू 12 व्या स्थानी गेला आहे. करोना संकटात बाधित बरे होण्याचे प्रमाण दिलासा देणारे आहे. आतापर्यंत जगभरातील सुमारे 20 लाख बाधित करोनामुक्त झाले आहेत.