काबूल: पाकिस्तानस्थित हक्कानी नेटवर्क या दहशतवादी गटाच्या वतीने 9/11 सारख्या दहशतवादी हल्ल्याचा कट केला जात आहे, असा गौप्यस्फोट अफगाणिस्तानच्या गुप्तवार्ता विभागाच्या माजी अध्यक्षाने केला आहे. रहमतुल्ला नबिल असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते अफगाणिस्तानच्या नॅशनल डायरेक्टोरेट ऑफ सिक्युरिटीचे माजी संचालक आहेत. पश्चिमेकडील अशा प्रकारच्या हल्ल्याला हक्कानी नेटवर्ककडून सर्व प्रकारे सहकार्य केले जात आहे. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादापासून सावध राहण्याचा इशाराही नबिल यांनी दिला आहे.
“जर पाकिस्तानकडून दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवले गेले नाही, तर आपल्याला 9/11 सारखा आणखी एक हल्ला झालेला बघायला मिळेल. अल-कायदाचा अल जवाहिरी, अबु मुहम्मद अल मसरी आणि सैफ उल अदेल हे दहशतवादी अजूनही पश्चिमेकडे सक्रिय आहेत. पाकिस्तानस्थित हक्कानी नेटवर्कच्या पाठिंब्यावर हे दहशतवादी पश्चिमेत 9/11 सारखा हल्ला करण्याचा कट करत आहेत.’ असे नबिल म्हणाले.
अयमान अल जवाहिरी हा इजिप्शियन दहशतवादी असून जून 2011 मध्ये पाकिस्तानात ओसामा बिन लादेन अमेरिकेच्या कमांडोंकरवी मारला गेल्यानंतर त्याने अल-कायदाचा ताबा घेतला आहे. मसरी आणि अदेल हेदेखील इजिप्तचेच असून अल-कायदाचे वरिष्ठ दहशतवादी आहेत. हक्कानी नेटवर्क 1980 मध्ये अस्तित्वात आले. त्यात जलालुद्दीन हक्कानीच्या निकटवर्तीयांचा समावेश आहे. सिराजुद्दीन हक्कानी सध्या या गटाचा म्होरक्या आहे. या गटात 15 हजार दहशतवादी सहभागी आहेत.