नगर -दारू दुकानातून अधिकृतपणे विक्रीला सुरुवात झाल्यानंतरही शहरात बेकायदेशीर दारू विक्री करण्याचे सत्र सुरू असल्याचे दिसून आले. रुग्णवाहिकेतून दारूची वाहतूक केली जात असल्याचे चव्हाट्यावर आल्यानंतर आता शहरामध्ये चक्क स्कूल व्हॅनमधूनच दारूची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. लॉकडाऊनच्या काळातही बेकायदा धंदे सुरूच असून, गुन्हेगार यासाठी वेगवेगळे फंडे वापरत असल्याचे नगरच्या या घटनेतून समोर आले आहे.
इतर वाहनांना बंदी असल्याने रुग्णवाहिकेतून दारू विक्री केली जात असल्याचा प्रकार गेल्या आठवड्यातच उघडकीस आला होता. त्यानंतर आता स्कूल व्हॅनमधून विक्रीचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संजय एकनाथ लोणारे (रा. कापूरवाडी) याला अटक केली असून, त्याच्याकडून दारू, व्हॅनसह एक लाख 54 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नगर ते कापूरवाडी रस्त्यावर नागरदेवळे येथे तो स्कूल व्हॅन (क्र. एमएच- 12 एएफ- 4889) मधून दारू घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही खबर मिळताच पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला.
तेव्हा लोणारे हा स्कूल व्हॅनमधून दारू विक्री करत असल्याचे आढळून आले. व्हॅनमध्ये विदेशी मद्याच्या 36 बाटल्या, असा चार हजार 680 रुपये किमतीची दारू आढळून आली. पोलिसांनी त्याच्यासह सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून, अधिक तपास सुरू आहे. कालपासूनच नगरला दारूची दुकाने पुन्हा सुरू झाली असून, रांगेत उभे राहून मोठ्या प्रमाणावर दारू विकत घेतली जात आहे. त्यातील काही बाटल्या अशा पद्धतीने बेकायदेशीरपणे विकल्या जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.