नगर (प्रतिनिधी) – हातावर पोट असलेल्या व आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. चर्मकार विकास संघ व लोकनेते सीतारामजी घनदाट सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने अशा गरजूंना मदत पोहचविण्याचे कार्य अविरत सुरु आहे.
चर्मकार विकास संघाच्या महिला पदाधिकारी गरजूंच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या असून, गरजूंना जीवनावश्यक किराणा साहित्य किटचे वाटप करण्यात आले. संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, प्रदेश सचिव प्रा. सुभाष चिंधे, मुंबई प्रदेश अध्यक्ष सुभाष मराठे यांच्या पुढाकारातून गरजूंना मदत पोहचविण्यात येत आहे.
या उपक्रमात महिला पदाधिकारी रुख्मीनी नन्नवरे, मिनाक्षी साळवे, मिना नन्नवरे, संगीता वाकचौरे, डॉ. प्रिती कांबळे यांनी सामाजिक बांधिलकी जपत आर्थिक योगदानातून जीवनावश्यक वस्तूंचे किट तयार करुन गोरगरिब, घरकाम, मजुरी करणारे, हातावर पोट असलेल्यांना घरपोहच किराणा वस्तूंचे किट वाटप करत आहेत.