मुंबई – सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांवर हल्ले करण्याचे प्रकार राज्यात सुरू आहेत त्या प्रकरणांची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी सांगितले की अशा प्रकारची तीन ते चार प्रकरणे समोर आली असून त्याचे व्हिडीओही मिळाले आहेत. यातील दोषींना त्वरित अटक करण्याचा आदेश देण्यात आला आहे. वैद्यकीय कर्मचारी आणि पोलिसांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत असा इशाराही देसाई यांनी दिला.
गृहराज्यमंत्री म्हणाले की आम्ही मुंबई पोलीस आयुक्तांशी या विषयी आधीच चर्चा केली आहे. त्यांना हल्लेखोरांवर त्वरित कारवाई करण्याचा आदेश देण्यात आला आहे. ते म्हणाले की हल्ल्याच्या घटनांचे जे व्हिडीओ चित्रीकरण उपलब्ध आहे त्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटवली जात आहे. ज्यांची नावे यात निष्पन्न होतील त्यांना त्वरित अटक केली जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
राज्यातील बहुतांशी जनता लॉकडाऊनच्या नियमांचे कसोशिने पालन करीत आहे पण काही समाज कंटकांकडून पोलिसांवर हल्ले केले जात आहेत असे ते म्हणाले. या घटकांशी कठोरपणे मुकाबला केला जाईल असे गृहराज्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.