नगरपालिकेची नगराध्यक्षानांच नोटीस : पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
जुन्नर- लॉकडाऊनच्या कालावधीत बांधकाम किंवा त्या संबंधित सर्व कामांना बंदी घातली असली तरी जुन्नर शहरात काही ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. प्रशासनाने याबाबत शहरातील तिघांना नोटीसा धाडल्या आहेत. यामध्ये खुद्द नगराध्यक्ष शाम पांडे यांना रविवार पेठेतील बांधकाम सुरू असल्याबाबत नोटीस पाठविल्यामुळे खळबळ उडाली आहे. मात्र, हे काम माझ्या जागेतील असले तरी ढासळलेली सामाईक भिंत दुरुस्तीचे काम सुरू होते, असे पांडे यांनी सांगितले. पावसाळी वातावरण असल्यामुळे धोकादायक भिंतीची दुरुस्ती केवळ शेजारच्यांचा त्रास वाचविण्यासाठी केल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबतचा एक व्हिडिओ गुरुवारी (दि.30) सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या तीनही कामांची पाहणी केली असून याठिकाणी काम बंद केल्याचे मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर यांनी सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी नारायणगाव येथे कलिंगड विकणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केला होता. वडगाव सहानी येथील दशक्रियेवेळी अधिक नागरिक जमा केल्याच्या कारणावरून ज्याच्या घरी निधन झाले आहे. त्या व्यक्तींवर जुन्नर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पंपावरून इंधन आणणाऱ्या शेतकऱ्यांवर गाडी जप्तीसह गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे पोलीस या प्रकरणात काय भूमिका घेतात, याबाबत नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहे.
शहरात बांधकामासोबत इतरही संबंधित कामे सुरू असल्याचे चित्र आहे.
रंगरंगोटी, सिलिंग पिओपी, फरशी बसवणे आदी कामे सुरू असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. अनेक गावांमध्ये शहरातून येणाऱ्या नागरिकांचा ओघ सुरूच आहे. यामुळे करोनाविरुद्ध जोरदार लढा देणाऱ्या पोलीस, महसूल, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची अधिक शक्ती खर्च होत आहे. दरम्यान, शहरातील बांधकाम संघटनेने बांधकामाबाबत प्रशासनाकडे मागितलेली परवानगी नाकारली असून संघटनेच्या सदस्यांची सर्व कामे बंद असल्याचे अध्यक्ष मुकेश ताजणे यांनी सांगितले आहे.