शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरण
पुणे (प्रतिनिधी) – शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले आणि सुर्याजी जाधव या दोघांचा जामीन विशेष न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी फेटाळला. याप्रकरणी योगेश लकडे (वय-39, रा. आंबेगाव) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बँक गैरव्यवहार प्रकरणी 16 जणांवार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अनिल शिवाजीराव भोसले, सुर्याजी पांडूरंग जाधव , तानाजी पडवळ, शैलेश भोसले हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. अनिल भोसले आणि सुर्याजी जाधव यांनी जामिनासाठी अर्ज केला होता.
अनिल भोसले हे बँकेचे संचालक असतांना गैरव्यवहार झाला नाही. पोलिसांनी तपासादरम्यान सर्व कागपत्रे जमा केली आहेत. संचालक असल्याने बँकेचे दैनंदिन कामकाज पाहत नव्हते. त्यामुळे जामीन मंजूर करावा, असा युक्तीवाद बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आला. या मागणीस अतिरिक्त सरकारी वकील विलास पटारे यांनी विरोध केला.
अनिल भोसले संचालक असतानाच बँकेत गैरव्यवहार होण्यास सुरूवात झाली. रिझर्व्ह बँकेने निर्बंध लावले होते. त्यामुळे ठेविदारांना बँकेतून फक्त 1 हजार रूपये काढण्याची मुभा होती. असे असतांना भोसले यांनी बँकेतुन दोन कोटी रूपये काढले. कशाप्रकारे दोन कोटीचा व्यवहार झाला त्याचा हिशोब नाही. बँक खाते नसतांना 80 कोटी रूपयांचा धनादेश त्या खात्याच्या नावावर काढण्यात आला. त्या 80 कोटींचा हिशोब नाही. भोसले यांनी 2019 मध्ये जनजागृती संघटनेला प्रतिज्ञापत्र दिले होते. त्यात त्यांनी 1 लाख ठेविदारांचे 430 कोटी रूपये देण्याचे कबुल केले होते.
मात्र, त्यातील एकही रूपया ठेविदारांना दिला नाही. भोसले हे सामाजिक, राजकिय दृष्ट्या भक्कम असल्याने साक्षिदारांना फिरविण्याची शक्यता आहे. आता पर्यंत गुन्हातील 4 जणांनाच अटक करण्यात आली आहे. गुन्हाचा तपास सुरू असल्याने भोसले, जाधव यांचा जामिन अर्ज फेटाळावा, अशी मागणी सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकिल विलास पठारे यांनी केली. ही मागणी ग्राह्य धरत न्यायालयाने वरील आदेश दिला.