वाघोली – वाघोली येथे सापडलेल्या करोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची खासगी लॅबमध्ये केलेल्या करोना टेस्टमध्ये लोणीकंद येथील एका 27 वर्षीय तरुणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
करोनाचा शिरकाव झाल्याने लोणीकंद व वाघोलीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. लोणीकंदमध्ये ग्रामपंचायत, आरोग्य विभाग व पोलिसांच्या वतीने खबरदारी घेण्यात येत आहे.
खासगी लॅबमध्ये केलेल्या करोना टेस्ट रिपोर्टमध्ये वाघोली येथील चार जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या जवळपास 100 जणांची तपासणी करण्यात आली आहे. चौघांच्याही कुटुंबांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत.
वाघोलीतीलच एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोणीकंद येथील काही जणांची तपासणी केल्यानंतर मंगळवारी (दि. 21) एका तरुणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तरुणाची माहिती घेऊन पुढील उपचारासाठी पुणे शहरामध्ये पाठविण्यात येत आहे. या तरुणाच्या संपर्कात आलेल्यांची देखील माहिती घेऊन खासगी लॅबमध्ये टेस्ट करण्यात येत आहे. लोणीकंद येथील तरुणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर लोणीकंद ग्रामपंचायत, आरोग्य विभाग व पोलिसांच्या वतीने खबरदारी घेण्यात येत आहे.
वाघोलीत तिघांचे एनआयव्ही रिपोर्ट पॉझिटिव्ह
वाघोली येथे सुरूवातीच्या काळामध्ये सापडलेल्या तिघांचे करोना रिपोर्ट खासगी लॅबमध्ये पॉझिटिव्ह आले होते. यानंतर शासकीय एनआयव्ही लॅबमध्ये तिघांचे करोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तिघांवर उपचार सुरू असून तसेच चौथ्या व्यक्तीवर देखील उपचार केले जात आहेत.