सातारा – करोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात अत्याचश्यक सेवेतील वाहने सोडली तर कोणालाही पेट्रोल, डिझेलची विक्री न करण्याचे आदेश आहेत. मात्र, सातारा जिल्ह्यातील काही सरकारी बाबूंनी या राष्ट्रीय आपत्तीतही आपले खिसे भरण्यासाठी नवा फंडा शोधला आहे. स्वत:च्या ओळखपत्रांचा गैरवापर करून, ज्यांना आवश्यकता नाही, अशा लोकांच्या गाड्यांमध्ये पेट्रोल, डिझेल भरून देण्याचा गोरख धंदा या कर्मचाऱ्यांनी कमिशनच्या हव्यासापोटी सुरू केला आहे.
देशभरात करोनाचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे. या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र, राज्य शासन व प्रशासन अथक प्रयत्न करत आहे. देशव्यापी लॉकडाऊनमध्ये लोकांनी विनाकारण रस्त्यावर येऊ नये, यासाठी वेगवेगळे आदेश लागू करण्यात आले आहेत. साथरोग प्रतिबंधक व आपत्ती व्यवस्थापन कायदाही लागू करण्यात आला आहे. लोकांनी विनाकारण दुचाकीवरून वा चारचाकी वाहानांमधून फिरू नये, म्हणून अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या संस्था, व्यक्ती सोडून
इतर कोणालाही पेट्रोल अथवा डिझेलची विक्री न करण्याचे आदेश आहेत.
पेट्रोल व डिझेल मिळत नसल्याने गाड्या काढून विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. मात्र, जिल्ह्यातील काही सरकारी बाबूंनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे सर्रास उल्लंघन सुरू केले आहे. सातारा-कोरेगाव रस्त्यावर संगमनगर येथील एका पेट्रोल पंपावर बुधवारी (दि. 1) एका सरकारी कर्मचाऱ्याचे गैरकृत्य समोर आले आहे. या बहाद्दराने त्याच्या सरकारी ओळखपत्राचा गैरवापर करून इतरांच्या गाड्यांमध्ये पेट्रोल भरून दिल्याची धक्कादायक घटना घडली तर दुसऱ्या महाभागाने पंपावरून पेट्रोल नेऊन त्या परिसरातच थांबलेल्या एका दुचाकीस्वाराला चढ्या दराने विकले. याबाबत पेट्रोल पंपचालकाने संबंधित यंत्रणेकडे तक्रार केल्याचे समजते. दरम्यान, अशा प्रकारे इतरही सरकारी कर्मचारी गैरकृत्ये करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.