भाजपचा उपक्रम गरजूंना पुरवणार जीवनावश्यक वस्तू
सातारा – जिल्हयात भाजपची संघटनात्मक बांधणी आता करोनाच्या लढ्यात सक्रिय झाली आहे. भाजपच्या सातारा जिल्हा कार्यकारिणीला जिल्हयातील गरजू कुटुंबाची यादी सादर करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात सातारा शहरातून जीवनावश्यक वस्तूंचे मोदी कीट 75 कुटुंबांना वाटण्यात आले. सातारा शहरातील 500 कुटुंबांना मोदी कीट देण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने बॉम्बे रेस्टॉरंट चौकात राजस्थानी कुटुंबातील 70 सदस्यांना, आकाशवाणी केंद्राजवळ रेशन कार्ड नसणाऱ्यांना तांदूळ, साखर, गहू, चहा, तेल, मीठ, हळद, साबण आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असणाऱ्या मोदी कीटचे वाटप करण्यात आले. जरंडेश्वर नाका येथे पाच परप्रांतीय कुटुंबांना या सेवेचा लाभ देण्यात आला. यावेळी भाजप शहराध्यक्ष विकास गोसावी, सरचिटणीस प्रवीण शहाणे, जयदीप ठुसे, विक्रांत भोसले, किशोर गोडबोले, ऍड. प्रशांत खामकर, राहुल शिवनामे, शैलेंद्र कांबळे, युवा मोर्चा अध्यक्ष विक्रम बोराटे, किशोर गालफाडे, बजरंग चव्हाण उपस्थित होते. सातारा शहरातील 500 कुटुंबांना मोदी कीट देण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी सांगितले.
सोशल मिडियावर निबंध स्पर्धा
याशिवाय करोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा प्रसार व प्रचारासाठी प्रदेश कार्यकारिणीच्या सूचनेप्रमाणे जिल्हा संघटनेच्या वतीने सोशल मीडियावर चित्रकला व निबंध स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. चित्रकला स्पर्धा ही 17 वर्षे वयापर्यंतचा एक गट व दिसरा 17 वर्षापुढील वयोगटासाठी करोनाचे संकट व उपाययोजना या विषयावर ऑनलाइन घेण्यात आल्या आहेत. विजेत्यांना रोख बक्षीसे दिली जाणार आहेत. चित्र काढून ते व्हॉटसऍपला पाठवायचे असून हे आवाहन भाजपच्या सांस्कृतिक आघाडीने केले आहे. स्पर्धा निकाल 14 एप्रिल रोजी जाहीर करण्यात येणार आहे. याशिवाय 41 वर्षांच्या पुढील वयोगटासाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली आहे. घरात बसणे सकारात्मकरित्या कसे घेतले, करोनाच्या संकटाशी भारताने केलेला मुकाबला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाप्रमाणे संकल्प व संयम यांचा सर्वसामान्यांची मनःस्थिती सुधारण्यासाठी झालेला फायदा हे विषय निबंध स्पर्धासाठी देण्यात आले आहेत. हे निबंध 14 एप्रिलपर्यंत शहर उपाध्यक्ष माधुरी प्रभुणे व मनीषा पांडे यांच्याकडे जमा करावयाचे आहेत.
आर्थिक मदतीवर कार्यकारिणीचे मौन
भाजपचे अध्यक्ष जे. पी. नढ्ढा यांनी दिल्लीत तातडीने बैठक घेऊन भाजपच्या सर्व लोकप्रतिनिधींना करोनाच्या लढ्यासाठी एक महिन्याचे वेतन देण्याचे आवाहन केले होते. सातारा जिल्हयात भाजपच्या कोणत्याच लोकप्रतिनिधींनी आर्थिक मदतीची घोषणा केलेली नाही. जिल्हयात खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माणचे आमदार जयकुमार गोरे हे भाजपचे हेवीवेट नेते समजले जातात. माढा लोकसभा मतदारसंघातील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचीही कोणतीही आर्थिक मदतीची घोषणा नाही. भाजप जिल्हा कार्यकारिणीनेसुध्दा करोनाच्या लढ्याला आर्थिक ताकद देण्यास मौन साधल्याने पक्षाध्यक्षांच्या आवाहनाला साताऱ्यात प्रतिसाद नाही का, अशी चर्चा सुरू झाली आहे.