- बाधितांची संख्या दहावर
- आणखी सात संशयितांचे नुमने “एनआयव्ही’कडे पाठविले
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील करोना बाधितांची संख्या दहा झाली आहे. वैद्यकीय तपासणी अहवालात आणखी एका रुग्णाला “करोना’ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगळवारी “पॉझिटीव्ह’ आढळलेला हा रुग्ण युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका तसेच आर्यलॅंड येथे राहून दुबई मार्गे पिंपरी-चिंचवड शहरात आला आहे. त्याच्या सहवासितांची माहिती घेऊन त्यांना घरातील विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात येणार आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या 244 क्षेत्रीय सर्वेक्षण टीम तयार करण्यात आल्या आहेत.
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि नवीन भोसरी रुग्णालयामधून आजपर्यंत एकूण 80 व्यक्तींच्या घशातील द्रव्याचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) तपासणी करिता पाठविण्यात आले आहेत. एका व्यक्तीचा अहवाल “पॉझिटीव्ह’ आलेला असून उर्वरीत नऊ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. महापालिका हद्दीत आजपर्यंत दहा कोरोना बाधित रुग्ण रुग्णालयांमध्ये दाखल असून सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर पालिकेच्या रुग्णालयांमधील “आयसोलेशन’ कक्षामध्ये उपचार सुरु आहेत.
अहवाल निगेटिव्ह आलेल्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यांना घरात “क्वॉरन्टाईन’ करण्यात आले आहे. आज करोना “पॉझिटिव्ह’ आढळलेला रुग्ण हा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथून आर्यलॅंड येथे राहून दुबई मार्गे शहरात आलेला आहे. त्याच्या सहवासितांची माहिती घेवून त्यांना घरातील विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात येणार आहे. आज मंगळवारी एकूण सात संशियतांच्या घश्यातील द्रव्याचे नमुने “एनआयव्ही’कडे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल उद्यापर्यंत प्राप्त होणार आहे.
244 क्षेत्रीय सर्वेक्षण टीम
“करोना’ संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेमार्फत 244 क्षेत्रीय सर्वेक्षण टीम नियुक्त करण्यात आल्या आहेत. या टीममध्ये वैद्यकीय कर्मचारी, शिक्षण मंडळ कर्मचारी, महापालिका आयटीआय मधील कर्मचारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्यामार्फत संपूर्ण महापालिका हद्दीत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांची आज कार्यशाळा घेण्यात आली. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल रॉय, अतिरिक्तआरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर, डॉ. विजया आंबेडकर, डॉ. शैलजा भावसार, डॉ.संगीता तिरुमणी, वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित माने, डॉ.राहुल राऊत, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड आदी उपस्थित होते.
अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडू नका – आयुक्त
आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरातील “आयसीयू’ उपलब्ध असलेल्या सर्व खासगी रुग्णालय व्यवस्थापकांची बैठक घेतली. त्यांच्याकडे उपलब्ध असलेली बेड संख्या, व्हेंटिलेटर उपकरणांची माहिती घेतली. करोना आजाराचे संक्रमण थांबविण्यासाठी नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच फ्लूसारखी लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी तात्काळ वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी. चीन, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कोरिया, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली, इरान, दुबई, सौदी अरेबिया व युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशांमधून आलेल्या सर्व नागरिकांनी किमान 14 दिवस घरांमध्येच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.