जेजुरी-वाघापूर (ता. पुरंदर) परिसरातील इंदलकर मळा येथे पती,पत्नीचे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मेव्हण्यावर गोळ्या झाडून जबर जखमी केल्याची घटना रविवारी (दि. 8) रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत अमोल भगत (रा. राजुरी, ता. पुरंदर) हे जखमी झाले आहेत.
याप्रकरणी गोळीबार करणारा दत्तात्रय रामचंद्र इंदलकर असे (माजी सैनिक) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत सुनीता दत्तात्रय इंदलकर यांनी जेजुरी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. आरोपी दत्तात्रय इंदलकर यास जेजुरी पोलिसांनी शोध घेत ताब्यात घेतले आहे. दत्तात्रय इंदलकर हा पाच वर्षांपूर्वी लष्करातून निवृत्त झाला आहे. त्यांनी दुसरे लग्न केले असून ते सासवड येथे वास्तव्यास असतात.
फिर्यादी सुनीता इंदलकर आपल्या दोन मुलांसंमवेत सासू सासरे यांचेंबरोबर वाघापूर येथे असतात. आपल्या आई वडिलांना अधून मधून भेटायला आल्यानंतर दत्तात्रय इंदलकर हे नेहमी फिर्यादी सुनीता यांच्याशी वाद घालून मारहाण करून पुन्हा सासवडला निघून जायचे. रविवारी (दि. 8) सायंकाळी 7 वाजता दत्तात्रय इंदलकर आई वडिलांना भेटण्यासाठी आल्यानंतर त्यांनी मुलांना सासवडला घेऊन जाण्याचा हट्ट धरला. तर परीक्षा सुरू असल्याने सुनीता इंदलकर यांनी मुलांना नेण्यास नकार दिला.
यावेळी दत्तात्रय यांनी दमबाजी, मारहाण करत पिस्तुल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली.त्यामुळे घाबरून जाऊन सुनीता इंदलकर या दोन मुलांना घेऊन घरानजीक शेतात लपल्या व तेथून मोबाईलवरून आपल्या भावांशी संपर्क साधला. त्यांचे भाऊ अमोल भगत व इतर नातलगांनी तात्काळ इंदलकर मळा गाठला. त्यांना पाहाताच दत्तात्रय इंदलकर यांनी तुम्ही येथे कशाला आलात? असे म्हणत शिवीगाळ करत आपल्या पिस्तुलमधून गोळ्या झाडत पलायन केले. या गोळीबारात अमोल भगत जखमी झाले.त्यांना फिर्यादी व इतर नातलगांनी उपचारासाठी जेजुरी येथील खासगी रुग्णालयात व तेथून पुणे येथे हलविण्यात आले.
जेजुरी पोलिसांनी तात्काळ भा. द. वि. कलम 323, 504, 506, शस्त्र प्रतिबंधक कायदा 3 अन्वये गुन्हा दाखल करत आरोपी दत्तात्रय इंदलकर यास शोध घेऊन ताब्यात घेतले. त्यास सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने पुढील तपास करीत आहेत.