नीरेत पोलिसांच्या कार्यवाहीनंतरही विक्री जोरात
नीरा – नीरा शहरात पोलीस प्रशासनाने अवैध व्यवसायाभोवतालचे फास आवळल्यानंतरही नीरा परिसरात गुटखा, मटका व मावा जोरात सुरूच आहे. पोलिसांच्या हातावर तुरी देत निरेतील काही किराणा दुकानदार व पानटपरी चालक चोरी छुपे बंदी असलेला गुटखा व मावा विकत आहेत. त्यामुळे तरूणाई पुन्हा व्यसनाच्या आहारी जाऊ लागली आहे. यातून मोठी आर्थिक उलाढाल होत आहे.
पुरंदर तालुक्याच्या दक्षिण टोकाला असलेल्या नीरा शहरास बारामती, फलटण, खंडाळा तालुक्याच्या सीमा लागतात. सीमा भागाचा फायदा उठवत अनेक अवैध व्यावसायीक पोलिसांना चकवा देत आपला धंदा करीत आहेत. नीरा शहरातील एक किराणा दुकानदार होलसेल दराने गुटखा विक्री करतो. तर एका किराणा दुकानातील कामगार पार्टटाईम म्हणून रोज सकाळी दुचाकीवरून पाणटपरी धारकांना गुटखा पुरवतो.
त्यामुळे विक्रेत्यांना माल घरपोच मिळत आहे. त्याला वीर येथील पुरवठादाराकडून रोज गुटखा पुरवला जातो. हा प्रकार इतका सफाईदारपणे केला जात आहे. पोलीस प्रशासनाला याबाबात तपासही लागू दिला जात नाही. अवैध धंदा करीत असताना आम्ही सगळ्यांचे मिटवतो. त्यामुळे आमच्यावर कारवाई होणारच नसल्याचे हे विक्रेते ठामपणे सांगतात.
मध्यंतरी पोलिसांनी नीरा परिसरात चालणाऱ्या अवैध मटका व जुगाराच्या अड्डयावर छापे टाकून करवाई केली. मात्र, तरी देखील नीरेत चोरीछुपे मटका जोरात सुरू आहे. आता मटका व्यावसायिकच स्वतःच ग्राहकांकडे जाऊन बुकिंग घेत आहेत.
हा सर्व प्रकार मोबाइलच्या माध्यमातून होत असल्यामुळे पोलिसांना याचा सुगावा लागणे दुरापास्त होत आहे. हे बुकी कधी बारामती तालुक्यातील निंबुत तर कधी खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथे जाऊन ग्राहक शोधतात. नीरा निंबुत सीमेवर एका हॉटेललगत तर जुगार अड्डा जोरात सुरू आहे. बारामती पोलीस कारवाईसाठी आल्यावर ते पुरंदरमध्ये धूम ठोकतात. हे ठिकाण बारामती तलुक्यातील असल्याने जेजुरी पोलीस स्वतःहून कारवाईला पुढे येत नाहीत. त्यामुळे या व्यावसायिकांचे चांगलेच फावले आहे.
माव्याच्या नावाखाली नशेचा धंदा
राज्य सरकारने गुटखा बंदी केल्यापासून सर्वत्र पानटपरीमधून माव्याची विक्री जोरदारपणे केली जात आहे. गुटख्याला पर्याय म्हणून याकडे पाहिले जाते. मावा बनवताना सुपारी, चुन्याबरोबरच, तंबाखू व नशिल्या पदार्थांचा उपयोग केला जातो. अनेक ठिकाणी गांजा भिजवून त्याचे पाणी. तर काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रग्ज माव्यात मिसळल्या जातात. त्यामुळे एकवेळ दारू सुटेल.
पण मावा नाही, अशी स्थिती तरूणांची झाली आहे. काहींनी तर आपल्या माव्याचे ब्रॅडींगही केले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अशा माव्याचे बोर्ड पहायला मिळत आहेत. अशा प्रकारच्या नशिल्या पदार्थांमुळे तरूणाई बेधुंद होत आहे. मात्र, अन्नभेसळ विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. अशा प्रकारच्या पदार्थांच्या परिणामाचा अभ्यास करून त्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
नीरेतील अवैध धंद्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. अशा प्रकारचे अवैध व्यवसाय सुरू असल्यास तातडीने कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक पोलिसांना केल्या आहेत. मटका बुकिंग व्हॉट्सऍपद्वारे होत असेल तर सायबर विभागाच्या मदतीने कारवाई केली जाईल.
– अंकुश माने, सहायक पोलीस निरीक्षक, जेजुरी.