45 लाखांची गुंतवणूक ः कोंबड्यांसाठी अद्ययावत वातानुकूलित यंत्रणा
केडगाव -भांडगाव (ता. दौंड) येथील तरुणाने 45 लाख रुपये भांडवल गुंतवून अद्ययावत वातानुकूलित पोल्ट्री व्यवसाय सुरू केला आहे. हा परिसरातील पहिलाच प्रयोग आहे.
रामदास अशोक दोरगे असे या युवकाचे नाव असून विविध स्वरूपाचे प्रयोग राबवून त्याने पोल्ट्री व्यवसाय सुरू केला आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंक आणि वैयक्तिक प्रयत्नांतून भांडवल उभारले आहे. याबाबत रामदास दोरगे अभिमानाने सांगतो की बॅंकेचे कर्ज माजी आमदार आणि बॅंकेचे विद्यमान चेअरमन रमेश थोरात यांच्या माध्यमातून उपलब्ध झाले. सुमारे 18 लाख रुपये बॅंकेचे आणि उर्वरित 27 लाख स्वभांडवलातून 10 हजार पक्षांची अद्ययावत वातानुकूलित पोल्ट्री तयार केली आहे.
पोल्ट्री या व्यवसायातील सी. पी. इंडिया या कंपनीच्या मार्गदर्शनाखाली हा व्यवसाय केला जाणार आहे. त्यासाठी पक्षी लागणारे खाद्य मार्केटिंग वैद्यकीय सेवा कंपनीचे डॉ. संदीप पवार हे पाहणार आहेत. या अद्ययावत वातानुकूलित पोल्ट्री शेडमध्ये पक्षी 36 दिवसांत तयार होतात. तर इतर पोल्ट्री शेडमध्ये त्यासाठी 45 दिवसांचा कालावधी लागतो. सुमारे 10 दिवस पक्ष्यांना द्यावे लागणारे खाद्य वाचते.
त्यामुळे बाकीच्या पोल्ट्रीतील पक्षांची विक्री प्रतिकिलो 6 रुपये दराने होते तर येथील दर साडेनऊ रुपये प्रतिकिलो असा आहे. किलोमागे साडेतीन रुपये जास्त बाजारभाव दिला जातो. त्यामुळे उद्योग उभारण्याची प्रक्रिया खर्चिक असली तरी बाजारभाव चांगला मिळेल या आशेने परिसरातील अद्ययावत वातानुकूलित पोल्ट्री शेडचा पहिलाच प्रयोग सुरू करण्याचे धाडस रामदास दोरगे या तरुण व्यवसायिकाने सुरू करून नोकरीच्या मागे धावणाऱ्या तरुणांसमोर आदर्श निर्माण केला आहे.