- इच्छुकांमध्ये चलबिचल; कोणाला संधी, कोणाला डावलले जाणार?
पिंपरी – पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष निवड होऊन दोन आठवडे उलटले तरी कार्यकारणी जाहीर करण्यात आलेली नाही. कार्यकारणीमध्ये कोणाला संधी मिळणार आणि कोणाला डावलले जाणार यावरून सध्या जोरदार चर्चा रंगली असून, इच्छुकांमध्ये चलबिचल निर्माण झाल्याचे पहावयास मिळत आहे.
पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष म्हणून आमदार महेश लांडगे यांची निवड प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन आठवड्यांपूर्वी जाहीर केली होती. शहराध्यक्ष बदलल्यानंतर जुनी कार्यकारणी बरखास्त होऊन नव्या कार्यकारणीची घोषणा नव्या शहराध्यक्षांकडून केली जाते. मात्र दोन आठवड्यानंतर कार्यकारणीबाबत स्थानिक पातळीवर चर्चाही झालेली नाही. शहर भाजपामध्ये दोन्ही आमदारांच्या दोन गटासह निष्ठावंतांचा एक गट कार्यरत आहे. या तीन गटांना समावून घेतानाच महापालिकेच्या पुढील सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यकारणी जाहीर करण्याचे कसब आमदार लांडगे यांना साध्य करावे लागणार आहे.
जुन्या शहर कार्यकारणीमध्ये एकूण 36 पदाधिकारी होते. त्यामध्ये 4 सरचिटणीस, 8 उपाध्यक्ष, 12 चिटणीस, 1 कोषाध्यक्ष व कार्यकारणी सदस्यांचा समावेश होता. एवढ्याच सदस्यांना संधी दिली जाणार की जम्बो कार्यकारणी करत सर्वांना समावून घेतले जाणार हे गुलदस्त्यात आहे. कार्यकारणीमध्ये काम करण्यास इच्छुक असलेल्यांची सध्या चलबिचल सुरू आहे. भाजपाची कार्यकारिणी कधी जाहीर होणार याकडे या इच्छुकांचे लक्ष लागले आहे.