इच्छुकांची धाकधूक वाढली : भाजप नगरसेवकांमध्ये खदखद
पिंपरी – स्थायी समिती सभापती विलास मडेगिरी यांच्यासह आठ सदस्यांचा कार्यकाळ येत्या 29 फेब्रुवारीला संपणार आहे. त्यामुळे भाजपचे सहा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन नवीन सदस्यांना स्थायीमध्ये संधी मिळणार आहे. या आठ सदस्यांच्या नियुक्तीचा फैसला आज (बुधवार) महापालिकेच्या महासभेत होणार आहे. कोणाला स्थायी समितीचे सदस्यपद मिळणार याबाबतची पक्षाकडून आलेली नावे महापौर जाहीर करणार आहे. त्यामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. तर तीन वर्षामध्ये एकही पद न मिळालेल्या भाजपाच्या नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे. नेहमीच पदापासून वंचित राहिलेल्या नगरसेवकांना आता तरी संधी मिळणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
महापालिकेत यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता होती. 2017 मध्ये भाजपाची महापालिकेवर एकहाती सत्ता आली. तेव्हापासून अनेक नगरसेवकांना महत्त्वाची पदे मिळाली. विषय समिती, प्रभाग समिती तसेच स्थायी समितीमध्येही नगरसेवकांना संधी मिळाली. मात्र काही नगरसेवकांना तीन वर्षात एकही पद मिळाले नाही. तर काहींना तीन वर्षात दोन दोन पदे भूषविण्याची संधी मिळाली. ज्या सदस्यांना तीन वर्षामध्ये एकही पद मिळाले नाही, ते स्थायीच्या सदस्यपदाकडे डोळे लावून बसले आहेत.
मात्र शहरातील दोन आमदारांशिवाय महापालिकेत पानही हलत नसल्याची चर्चा आहे. स्थायी समितीच्या सदस्यपदासाठी आमदारांच्या मर्जीतील नावे न आल्यामुळेच 20 फेब्रुवारीची महासभा तहकूब करण्याचे राजकारण भाजपने केले होते. स्थायी समितीमध्ये मर्जीतील सदस्य असतील तर आपल्या भागातील तसेच हवी ती कामे करून घेता येतात. त्यामुळे भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे व माजी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मर्जीनुसारच स्थायीसाठी नावे येणार असल्याची चर्चा आहे.
मात्र, शहरातील कारभारी असलेल्या या आमदारांकडून वारंवार मर्जीतील सदस्यांनाच पदाचा लाभ दिला जातो. पदापासून नेहमीच वंचित ठेवत असल्याची खदखद भाजपच्या नगरसेवकांमध्ये आहे. सत्तेचे तीन वर्ष संपले आहेत. आता उरलेल्या दोन वर्षामध्ये कुणाला काय मिळणार याकडे नगरसेवकांचे लक्ष लागले आहे. तसेच आर्थिक मलई असलेल्या स्थायी समितीच्या सदस्यपदी एकदा तरी वर्णी लागावी अशी नगरसेवकांची इच्छा असते. त्यामुळे इच्छुकांची गर्दीही वाढलेली आहे.
दोन वर्ष सदस्यपदाचा निर्णय कायम ठेवला तर यावर्षी संधी मिळालेल्या सदस्यांना दोन वर्ष कालावधी मिळणार आहे. पुढील शेवटच्या वर्षी नियुक्ती झाल्यावर एकच वर्ष कालावधी मिळणार आहे. त्यामुळे याच वर्षी स्थायीत संधी मिळविण्याची अनेकांची इच्छा आहे. त्यामुळे भाजपमधील नगरसेवकांनी याचवर्षी स्थायीत प्रवेश मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. त्यामध्ये कुणाच्या प्रयत्नाला यश येणार हे आज महासभेमध्ये ठरणार आहे. तसेच ज्यांना संधी मिळणार नाही त्यांची पक्ष कुठल्या पदावर बोळवण करणार हे आगामी दिवसांत समोर येणार आहे.
राष्ट्रवादीकडून महिला सदस्य
राष्ट्रवादी कॉंग्रेसने तीन वर्षामध्ये स्थायी सदस्य पदासाठी महिला व पुरुष नगरसेवकांना समान संधी दिली आहे. मागील वर्षात नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ, यांच्यानंतर मयूर कलाटे, पंकज भालेकर यांना संधी देण्यात आली. यावेळी गीता मंचरकर, प्रज्ञा खानोलकर यांच्या जागी महिला नगरसेविकांनाच स्थान दिले जाणार आहे. मात्र कोणत्या महिला नगरसेविकेला स्थायीचे पद द्यायचे याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला असल्याचे समजले आहे. त्यानुसार पक्षाकडून नावे दिली जाणार आहे.
पदापासून वंचित नगरसेवकांच्या भूमिकेकडे लक्ष
पिंपरी विधानसभेतून संदीप वाघेरे, शैलेश मोरे, चिंचवड मतदारसंघातून संतोष कांबळे, चंद्रकांत नखाते, अभिषेक बारणे, सुरेश भोईर, तुषार कामठे, संदीप कस्पटे, जयश्री गावडे, शत्रुघ्न काटे हे पदापासून वंचित आहेत. तर भोसरी मतरदारसंघातून रवी लांडगे, नितीन लांडगे, वसंत बोराटे, हिराबाई लांडगे, सारिका बोऱ्हाडे, प्रियंका बारसे यांना अद्याप एकही पद मिळालेले नाही. भाजपच्या या नगरसेवकांपैकी कुणाला स्थायीचे पद मिळणार याचा फैसला आज महासभेत होणार आहे.