बेल्हे – राजुरी (ता. जुन्नर) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि सह्याद्री व्हॅली अभियांत्रिकी महाविद्यालय, राजुरी (ता. जुन्नर) यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवस चाललेल्या या श्रमसंस्कार शिबिराची नुकतीच सांगता झाली.
या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी कोळवाडी, ज्ञानेश्वर देवस्थान (रेडा समाधी मंदिर) आळे परिसराची स्वच्छता केली आणि परिसरात वृक्षारोपण केले. डॉ. रमेश काकड यांनी रोजगाराच्या संधी या विषयावर मार्गदर्शन केले. प्रा. दत्तात्रय टिकेकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, प्रा. महेश चिंचोले यांनी व्यक्तिमत्व विकास या विषयावर व्याख्यान दिले. आशिष शिंदे यांनी आयुर्वेद या विषयावर मार्गदर्शन केले. प्रा. गुळवे यांनी योगासन प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विशालमहाराज हाडवळे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच एक भारत श्रेष्ठ भारत या विषयावर प्रा. आर. सी. भुजबळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जुन्नर पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे यांच्या योगदानाने आरोग्य शिबीर घेण्यात आले. त्यामध्ये परिसरातील 110 नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला आणि आरोग्य तपासणी केली.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय झोपे, उपप्राचार्य पी. बालारामुडू, प्रा. निलेश पिंजरकर आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. नागेश लेंभे यांनी केले. सूत्रसंचालन राकेश शेलार यांनी केले. तर आभार उपप्राचार्य पी. बालारामुडू यांनी मानले.