जमुई: जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) माजी विद्यार्थी कन्हैया कुमार यांच्या ताफ्यावर सोमवारी पुन्हा एकदा हल्ला करण्यात आला. जमुई ते नवादा दरम्यान त्यांच्या त्याफ्यावर अंडे फेकण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्हैया कुमार रविवारी आपल्या ‘जन गण मन यात्रेवर आहेत. जमुई येथे सभेला संबोधित करण्यासाठी आले होते. सोमवारी त्यांना महिसाउरी बसस्थानकाजवळ लोकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. यावेळी कन्हैया कुमार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली असून त्यांच्यावर अंडी फेकण्यात आली.
या दरम्यान कन्हैया कुमार समर्थक आणि स्थानिक नागरिकांमध्ये धक्काबुकी झाली. याशिवाय काही पत्रकारांना देखील मारहाण केल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी उपस्थित पोलिस प्रशासनाने प्रकरण शांत केले असून, कन्हैया कुमार याना बाहेर काढले.
दरम्यान कन्हैया कुमार एनआरसी आणि सीएएविरूद्ध त्यांच्या ‘जन-गण-मन यात्रेवर आहेत. या महिन्यात ते बिहारमध्ये जवळपास पन्नास सभा घेतील. 30 जानेवारी या यात्रेची बेतियाहून सुरवात करण्यात आली होती. 29 फेब्रुवारीला या यात्रेची समाप्ती होणार आहे. दरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर 7 फेब्रुवारी रोजी कटिहार हल्ला करण्यात आला होता.