नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाची आणखी एक यादी समोर आली असून कन्हैय्या कुमार यांना इशान्य दिल्लीतून कॉंग्रेसने मैदानात उतरवले आहे. भारतीय जनता पार्टीच्या मनोज तिवारी यांच्या विरोधात त्यांची लढत होणार आहे. तिवारी हे विद्यमान खासदार असून भोजपुरी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आहेत.
विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेले कन्हैय्या कुमार मुळचे बिहारचे असून तेथूनच त्यांच्या सक्रीय राजकारणाला सुरूवात झाली. मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कॉंग्रेसने त्यांना पुन्हा एकदा दिल्लीच्या राजकारणात आणले आहे.
कॉंग्रेसच्या अगोदरच्या याद्यांमध्ये कन्हैय्या कुमार यांचे नाव नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते. तथापि, त्यांना दिल्लीतूनच रिंगणात उतरवले जाईल असा तर्कही लढवला जात होता. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
कन्हैय्या कुमार यांना जेथून उमेदवारी देण्यात आली आहे तो उत्तर पूर्व दिल्लीचा भाग हा उत्तर प्रदेशच्या सीमेला लागून आहे. या भागात उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे.
पूर्वांचल भागातून येणारे मतदारही येथे मोठ्या संख्येने असल्यामुळे त्यांची मते निर्णायक ठरत असतात. त्यामुळेच भाजपचे मनोज तिवारी येथून दोन वेळा विजयी झाले आहेत. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी मोठ्या मताधिक्क्याने ही निवडणून जिंकली होती.
मनोज तिवारी मुळचे पूर्वांचलचे आहेतच मात्र भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात गायक आणि कलाकार असल्यामुळेही त्यांची लोकप्रियता मोठी आहे. त्यांना पुन्हा येथून संधी देत भाजपने आपले पत्ते उघड केले होते. मात्र कॉंग्रेसचा उमेदवार ठरत नव्हता.
तथापि, कॉंग्रेसने आता बिहारमधील किंवा उत्तर भारतीयांमधील लोकांच्या परिचयाचा असलेला एक युवा चेहरा आता समोर आणला आहे. धृवीकरणाच्या दृष्टीनेही नॉर्थ इस्ट अर्थात उत्तर पूर्व दिल्लीला विशेष महत्व आहे. २०२० मध्ये दिल्लीत ज्या दंगली झाल्या होत्या त्यांचा पाया नॉर्थ इस्ट दिल्लीतच रचला गेला होता.
याच भागातील सीमलपूर, मुस्तफाबाद, बाबरपुर आणि कारगिल नगर आदी भागांत मुस्लिमांची संख्या मोठी आहे. दिल्लीतील इंडिया आघाडीला मुस्लिमांची एकगठ्ठा मते आपल्या बाजूने हवी आहेत. कन्हैय्या कुमार यांची उमेदवारी त्या दृष्टीने कॉंग्रेसला फायदेशीर ठरणार आहे.
कन्हैय्या कुमार यांची वक्तृत्व शैली लोकप्रिय आहे. ते जेएनयूमध्ये शिकत होते तेंव्हा त्यांची प्रत्येक घोषणा आणि प्रत्येक भाषण सोशल मीडियावर व्हायरल होत होते. त्यावेळी विद्यार्थ्यांमध्ये त्यांची लोकप्रियता प्रचंड होती.
त्याच लोकप्रियतेचा लाभ घेण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न आहे. नार्थ इस्ट दिल्लीत आता एका लोकप्रिय उमेदवारासमोर दुसरा लोकप्रिय उमेदवार उभा करण्यात आला आहे. कन्हैय्या कुमार यांच्या माध्यमातून युवा वर्गाला आपल्याकडे खेचण्याचाही कॉंग्रेसचा प्रयत्न आहे.