सात-बारा उतारा आणि गाव नकाशा एकमेकांशी “लिंक’
सविस्तर माहिती : भूमि अभिलेख विभागाचा उपक्रम
पुणे – राज्य भूमी अभिलेख विभागाने सात-बारा उतारा आणि गाव नकाशा एकमेकांशी “लिंक’ केला आहे. त्यामुळे जमिनीची खरेदी आणि दस्त नोंदणी करण्यापूर्वी जमिनीच्या चतु:सीमा, जमिनीचा मालक ही सर्व माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. यापूर्वी गाव तलाठ्याच्या कार्यालयात जाऊन सर्व माहिती घ्यावी लागत होती. त्याची आता गरज लागणार नाही. सातबारा उतारा गाव नकाशाशी जोडल्यामुळे राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील, कोणत्याही तालुक्यातील अथवा गावातील जमिनींची अक्षांक्ष – रेखांक्षसह (जीपीएस लोकेशन) सर्व माहिती घरबसल्या उपलब्ध होत आहे. यामुळे चुकीची जमीन दाखवून तसेच जमिनीची विक्री करण्याच्या गैरप्रकाराळा आळा बसणार आहे.
भूमि अभिलेख विभागाने अधिकाधिक सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. आता याच्याच पुढच्या टप्प्यात गाव नकाशा सात-बारा उताऱ्याशी जोडण्यात आला आहे. जागा खरेदी करताना ती कुठे आहे, त्याची माहिती सविस्तर दिली जात नाही. यामुळे संबधित व्यक्तीची फसवणूक होते. भूमी अभिलेख विभागाने गाव नकाशे पीडीएफमध्ये उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांची निशुल्क प्रिंट काढून दस्त खरेदीला देखील जोडता येणार आहे. भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर गावाचे नाव निवडल्यावर गावचा नकाशा उपलब्ध होता. संबधित सर्व्हे नंबर निवडल्यावर त्या हद्दीचा नकाशा उपलब्ध होऊन त्या सर्व्हे नंबरमधील खातेदार शेतकऱ्यांची नावे सुद्धा दिसत आहे.
37 हजार गावांची माहिती जोडली
राज्यात एकूण 44 हजार गावे आहेत. त्यापैकी 37 हजार गावातील गाव नकाशे सातबारा उताऱ्याशी लिंक करण्यात आले आहेत. तर, पुणे जिल्ह्यात 1910 गावे आहेत. त्यापैकी केवळ 135 गावांचे गावनकाशे लिंक करण्याचे काम राहिले आहे. हे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच उर्वरित सर्वच गावातील गाव नकाशे लिंक करण्याचे काम पूर्ण होईल, अशी माहिती उपजिल्हाधिकारी आणि ई फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी दिली.