पशुसंवर्धन राज्यमंत्री भरणे यांची माहिती : सर्वसामान्यांचे राहणीमान उंचावणार
रेडा -गरीब घरची गाई म्हणून ओळखली जाणारी शेळी, यातून चालणारे राज्यातील लाखो कुटुंबांचे प्रपंच, ग्रामीण भागातील शेळी व्यवसायाकडे चाललेला कल पाहून राज्यातील धनगर व तत्सम जाती, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय, अल्पसंख्याक, आदी महिला सहकारी संस्थांना शेळी गटाचे वाटप केले जाणार असल्याची माहिती पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
भरणे म्हणाले की, महिला सहकारी संस्थांना शेळी गटाचे वाटप करण्यासंदर्भात मंत्रिमंडळाचा निर्णय झाला आहे. कालानुरूप महागाई वाढलेली आहे. त्यामुळे शेळ्यांच्या किंमती वाढलेल्या आहेत. त्यानुसार शेळी गटाची किंमतही वाढली आहे.
सुधारित प्रस्तावानुसार शेळीसाठी 8 हजार आणि बोकडासाठी 10 हजार रुपये लाभार्थी गटांना देण्याचा पशुसंवर्धन खात्याचा मानस आहे. या योजनेसाठी शासनाचे 75 टक्के अनुदान असून 25 टक्के हिस्सा लाभार्थ्यांना भरावा लागणार आहे. या योजनेनुसार 10 शेळ्या आणि एका बोकडाचे वाटप एका गटाला केले जाणार आहे.
धनगर समाजातील ज्या महिलेकडे जात प्रमाणपत्र नाही, अशा महिलांनी माहेर आणि सासरच्या जवळच्या नातलगांचे जात प्रमाणपत्र सादर करावे लागणार असल्याची ही माहिती भरणे यांनी दिली.
दरम्यान, राज्यमंत्री भरणे यांनी शेळी गट वाटपासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड तालुक्यासह अन्य तालुक्यातील महिलांना रोजगाराच्या वाटा मिळणार आहेत.
त्यामुळे सर्वसामान्यांचे राहणीमान उंचावण्यास मदत होणार आहे. राज्यातील अनेक महिला सहकारी संस्थांना या योजनेमुळे उर्जितावस्था येणार आहे.
महिला संस्थांना मिळणार लाभ
राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत महिला सहकारी संस्था मोठ्या प्रमाणात उभारलेले आहेत. मात्र, या नुसत्या महिला संस्था कागदावर दिसत होत्या, अशा महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या योजनांचे दरवाजे बंद होते. मात्र, पशुसंवर्धन खात्याच्या माध्यमातून या संस्थेमधील महिलांना रोजगार शेळी गटातून निर्माण करता येणार आहे. त्यामुळे उपेक्षित महिला संस्थांना संजीवनी मिळाली आहे.