नवी दिल्ली : जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात 15 डिसेंबर रोजी झालेल्या हिंसाचार प्रकरणात पोलिसांविरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी न्यायलयात जाऊ, असे आश्वासन विद्यापीठाच्या कुलगुरू नज्मा अख्तर यांनी निदर्शक विद्यार्थ्यांची भेट घेऊन दिले.
आम्ही तक्रार दाखल केली. पण पोलिसांनी एफआयआर दाखल केली नाही. या बाबत आम्ही सरकारकडेही आक्षेप नोंदवला आहे, असे त्या म्हणाल्या. पोलिसांनी परवानगी न घेता विद्यापीठाच्या आवारात प्रवेश केला. त्यामुळे त्यांच्या विरोधात एफआयआर नोंदवावा, यासाठी आम्ही न्यायालयात जाणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
या हिंसाचारानंतर वस्तीगृह खाली करण्याबाबत आपण कोणालाही नोटीस बजावली नाही. विद्यापीठातील सुरक्षा व्यवस्था या पुर्वीच वाढवण्यात आली आहे. याकडे अख्तर यांनी लक्ष वेधले.
परीक्षा पुढे ढकलल्या
निदर्शक विद्यार्थ्यांनी मागणी केल्याप्रमाणे कुलगुरूंनी सर्व विभागप्रमुखांची भेट घेतली. त्यानंतर सत्र परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा करण्यात आली.