पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) वितरीत करण्यात येणाऱ्या पंचिंग पासवर खाडाखोड करून तारखांमध्ये फेरफार करण्याबाबतचे प्रकार वारंवार समोर आले आहेत. तारखांमध्ये खाडाखोड केल्याने प्रशासनाला महसूलावर पाणी सोडावे लागते. त्यामुळे प्रशासनाकडून अशा घटना उघडकीस आल्यानंतर संबंधित प्रवाशांना ब्लॅकलिस्ट करण्यात येणार असल्याची माहिती पीएमपीएल अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून प्रवाशांना स्वस्त दरात प्रवास करता येण्यासाठी पासेसची सोय उपलब्ध करून दिली आहे. यासाठी, मासिक, दैनंदिन स्वरुपाचे पास दिले जातात. नुकतेच प्रशासनाने पासचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पास काढणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दरम्यान, पासधारकांकडून पासवर पेनाने लिहिलेल्या तारखेवर खाडाखोड केले जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत.
काही दिवसांपूर्वी एका प्रवाशाने पासवरील सहा आकडा खोडून आठ केल्याचे तपासणीदरम्यान उघडकीस आले. त्यानंतर प्रशासनाकडून पासच्या तारखेवर सेलो टेप लावण्याच्या सूचना केल्या आहेत. जेणेकरून प्रवाशांना तारखांमध्ये खाडाखोड करता येणार नाही. यातच जे कर्मचारी पासवर सेलो टेप लावणार नाहीत, अशांवर कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. तर, पासवरील तारखांवर खाडाखोड करणाऱ्या प्रवाशांना ब्लॅकलिस्ट करण्यात येणार आहेत. तसेच या प्रवाशांना पुन्हा पासचा लाभ घेण्यासाठी अडचणी येणार असल्याची माहिती पीएमपीच्या वाहतूक विभागाकडून देण्यात आली.