बारामतीत जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक : पेयजल योजना, डीबीटीवर चर्चा
पुणे- जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक यावेळी बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्रामध्ये (केवीके) पार पडली. नेहमी वादळी ठरणारी ही बैठक निसर्गाच्या सानिध्यात जाताच शांततेमध्ये पार पडली. यावेळी जिल्ह्यातील आरोग्य विभागावर चर्चा झाली. मात्र, तीही शांततेत, तसेच राष्ट्रीय पेयजल योजना, डीबीटी आणि जुन्नर तालुक्यातील शाळा पाडल्याचे प्रकरण याबाबत चर्चा झाली. विशेषत: अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी त्यांच्या तीन वर्षांत कार्यकाळात राज्यामध्ये सत्ता नसतानाही जास्तीत जास्त निधी जिल्ह्यात आणून विकासाला गती दिली. त्यामुळे सदस्यांकडून अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला.
जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीची बैठक पार पडली. यावेळी सभापती प्रवीण माने, सुजाता पवार, राणी शेळके, सुरेखा चौरे, सदस्य व गटनेते शरद बुट्टेपाटील, रणजीत शिवतरे, आशा बुचके, दत्तात्रय झुरूंगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्यासह सदस्य, अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात साथीच्या आजारांनी थैमान घातले असताना मागील नऊ महिन्यांपासून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये (पीएससी) औषधांचा तुटवडा आहे. राज्य शासनाकडून निधी आलेला नाही असे आरोग्य विभागाकडून सांगितले जाते. मात्र, तोपर्यंत रूग्णांना उपचार द्यायचे नाही का? असा प्रश्न सदस्य शरद बुट्टे पाटील, रणजीत शिवतरे यांनी उपस्थित केला.
त्यामुळे जिल्हा परिषदेने निधीची वाट न पाहतात, तात्काळ औषध खरेदीसाठी प्रत्येक पीएससीला 35 हजार रूपये निधी उपलब्ध करून द्यावा. जेणेकरून या निधीमधून औषध खरेदी करता येतील, अशी मागणी सदस्यांनी केली. तसेच राष्ट्रीय पेयजल योजनेची कामे तत्काळ मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करावा. या योजनेचा निधी परत जावू नये यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा करून कामे मार्गी लावावीत. तसेच जुन्नर तालुक्यातील शाळा पाडल्याप्रकरणी आशा बुचके यांनी प्रश्न उपस्थित केल्यावर अध्यक्षांनी तात्काळ चौकशी करून पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, बैठकीनंतर सदस्यांनी अध्यक्षांच्या अभिनंदनाचा ठराव मांडत, विश्वासराव देवकाते यांनी तीन वर्षांत पक्षपातीपणा न करता प्रत्येक सदस्याला न्याय दिला. जिल्हा परिषदेच्या विकासाला गती दिली, असे मनोगत सदस्य आशा बुचके, रणजीत शिवतरे, शरद बुट्टे पाटील, दत्तात्रय झुरूंगे यांनी व्यक्त केले. सभापती प्रवीण माने यांनी आभार मानले.
झेडपीचे कारभारी झाले “फ्रेश’
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक यावेळी बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्रामध्ये (केवीके) घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक बंददाराआड होत असते. या बैठकीला फाटा देत आणि नवीन कारभारी निवडीपूर्वी अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी सर्व पदाधिकाऱ्यांची बारामतीत निसर्गाच्या सानिध्यात आयोजित केली. तसेच सर्व विषयावर शांततेत पार पडली. त्यामुळे सरत्या वर्षाला निरोप देण्यापूर्वीची ही बैठक सर्वांना सुखावणारी ठरली आहे. त्यामुळे पदाधिकारी फ्रेश झाले आहेत.