मुंबई -शिवसेना नेते संजय राऊत यांनी रविवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांना मोबाईल फोनवरून मेसेज पाठवला. त्यानंतर राऊत यांना फोन कॉल करणार असल्याची माहिती पवार यांनी दिली. सरकार स्थापनेवरून निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पर्यायांची चाचपणी करत आहे. त्यातून त्या पक्षाने राष्ट्रवादीशी संपर्क साधल्याची चर्चा सुरू झाली आहे.
त्या चर्चेला राऊत यांनी अजित पवार यांना पाठवलेल्या मेसेजमुळे आणखीच खतपाणी मिळाले. स्वत: पवार यांनी तो मेसेज पत्रकारांना दाखवला. नमस्कार, मी संजय राऊत. जय महाराष्ट्र, एवढेच त्या मेसेजमध्ये म्हटले आहे. मी फोन कॉल करावा असे राऊत यांना अभिप्रेत असावे. मी कॉल करेन, असे पवार यांनी स्पष्ट केले. त्याआधी पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी सुमारे 170 आमदारांच्या पाठिंब्याच्या जोरावर शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, असा दावा केला.
त्याविषयी पत्रकारांनी विचारल्यावर पवार उत्तरले, ती संख्या त्यांनी कशी काय सांगितली ते ठाऊक नाही. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर मिळून आमचे संख्याबळ 110 इतके आहे. आम्हाला विरोधात बसण्याचा कौल जनतेने दिला आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.