अर्धा तास ज्यादा मिळाल्याने ग्राहक समाधानी : कर्मचाऱ्यांमध्ये मात्र अस्वस्थता
पिंपरी –राष्ट्रीयकृत बॅंकेच्या कामकाजाच्या वेळेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व राष्ट्रीयकृत बॅंकेच्या कामकाज बदललेल्या वेळेनुसार सुरु झाले आहे. नवीन वेळेनुसार ग्राहकांना अर्धा तास अधिक मिळत असल्याने बहुतांश ग्राहकांतून या नव्या निर्णयाचे स्वागत होताना दिसत आहे. त्यामुळे, सकाळपासूनच सर्वच बॅंकेत ग्राहकांची गर्दी होत आहे.
राष्ट्रीयकृत बॅंकांची यापूर्वी बहुतांश शाखेची वेळ ही सकाळी 10.30 ते दुपारी 4 अशी होती. तर काही बॅंकेच्या शाखांच्या कामकाजाची वेळ वेगवेगळी असल्याने ग्राहकांचा संभ्रम होत होता. हा संभ्रम दूर करण्यासाठी बॅंकांच्या वेळा एकसारख्या असाव्यात, अशी सूचना अर्थ मंत्रालयाने केली होती. त्यानंतर या वेळा निश्चित करण्यासाठी बॅंकांची शिखर संघटनेने पुढाकार घेऊन नवे वेळापत्रक निश्चित करण्यात आले. त्यानुसार मागील दोन दिवसांपासून या नवीन वेळापत्रकानुसार बॅंकेच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे.
आता बॅंकांच्या शाखांच्या वर्गवारीनुसार बॅंकांचे कामकाज तीन वेळांमध्ये होत आहे. वर्गवारी करण्यात आलेल्या तिन्ही वेळेनुसार आता ग्राहकांना मात्र अधिकचा अर्धा तास मिळू लागला आहे. त्यामुळे, अनेक ग्राहकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच सकाळपासूनच व्यवहार करता येत असल्याने ग्राहकांचा वाया जाणारा वेळही वाचू लागला आहे. मागील दोन दिवसांपासून नवीन वेळेनुसार होत असलेल्या या कामाकाजामुळे शहरातील अनेक बॅंकासमोर सकाळी 9 वाजल्यापासूनच गर्दी हात असल्याचे पहायला मिळत आहे.
ग्राहकांना मिळेल बॅंकेत माहिती
बॅंकांच्या शाखा व्यवस्थापकांशी चर्चा करून शाखा निवासी क्षेत्रात आहेत की व्यापारी क्षेत्रात हे वर्गीकरण निश्चित करण्यात आले आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठका झाल्या. त्यानुसार सर्व शाखांच्या दर्शनी भागात तसे फलक लावण्यात आले आहेत.
नवी वेळ कर्मचाऱ्यांसाठी मात्र त्रासदायक
नवीन नियमाचे खातेदारांनी स्वागत केले असले तरी कर्मचाऱ्यांना मात्र अर्धा तास ज्यादा काम करावे लागत आहे. काही राष्ट्रीयकृत बॅंकाच्या शाखा शहर व ग्रामीण भागामध्ये आहेत. या बॅंकाचा समावेश रहिवाशी क्षेत्रामध्ये येतो. पूर्वी या बॅंका सकाळी साडेदहा वाजता सुरु होत होत्या. आता मात्र सकाळी 9 वाजता सुरु होत आहेत. त्यामुळे, शाखेतील कर्मचाऱ्यांना लवकर घराबाहेर पडावे लागत आहे.
असे चालेल कामकाज
नव्या निर्णयानुसार निवासी क्षेत्रातील बॅंका 9 ते 4 या वेळेत सुरू राहतील. 9 ते 3 या वेळेत ग्राहकांना त्यांचे व्यवहार करता येतील. व्यापारी भागातील शाखा 11 ते 6 या वेळेत सुरू राहतील. या शाखांच्या ग्राहकांना 11 ते 5 या वेळेत आपले व्यवहार करता येतील. उर्वरित परिसरातील शाखा 10 ते 5 दरम्यान सुरू राहतील. त्यांच्या ग्राहकांना 10 ते 4 या वेळेत व्यवहार करू शकतील.