गौरी गायीचे केले थाटात डोहाळ जेवण
तळमावले (वार्ताहर) –पाच वर्षांपासून कुटुंबातील एक सदस्य बनलेल्या गौरी गायीचे साबळेवाडी सागाव, ता. पाटण येथील शेतकरी कुटुंबाने आज थाटामाटात डोहाळे जेवण करुन गाव जेवणही घातले. अत्यंत भारावलेल्या वातावरणात झालेला हा कृतज्ञतेचा सोहळा बघण्यासाठी आबालवृध्दांनी गर्दी केली होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गणेश पाटील, प्रवीण कदम (गोशाळा सळवे), गोकथा प्रवक्ते विजय महाराज, तन्मय पाटील, वाल्मिक दिंडीचे अध्यक्ष अधिकराव साबळे, सामाजिक कार्यकर्ते राजू रोडे, रंगप्रभा आर्टस चे भगवान जाधव, अरविंद कुंभार, सुरेश देसाई, पोलीस पाटील बाळासो साबळे, सरपंच श्रीनिवास साबळे, बी. डी. साबळे उपस्थित होते.
साबळेवाडीतील आनंद साबळे यांच्या खिलार गायीला पाच वर्षापूर्वी झालेल्या वासराचे त्यांनी लहान बाळाप्रमाणे संगोपन करुन त्याचे उत्तम संगोपन केले आहे. कुटुंबातील एक सदस्य बनलेल्या या गायीला प्रेमाने सर्वजण गौरी म्हणतात. आणि याच नावाने हाक मारल्यावरच ती प्रतिसाद देते. अतिशय शांत स्वभावाच्या गौरीला चरायला शिवारात नेताना दोरी लावण्याचीही गरज भासत नाही.
सकाळी घरच्या माणसामागून ती शेतात जाते आणि दिवसभर तेथे चरल्यावर सायंकाळी त्यांच्याबरोबर घरी येते. ही लाडकी गाय गाभण असल्याची बातमी कळल्यापासून साबळे कुटुंबीयांच्या आनंदाला भरते आले होते. दिवाळीतील वसुबारसाचा मुहुर्त साधून तिच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचे त्यांनी नियोजन केले. शाहीर आनंद साबळे त्यांच्या पत्नी अंजना या 15 दिवसांपासून त्याच्या नियोजनात व्यस्त होते. पै-पाहुणे नातेवाईक व ग्रामस्थांना मोबाईलवर पत्रिका पाठवून देण्यात आल्या होत्या.