पिंपरी विधानसभेत ताकद वाढली
युवकांची फळी तयार करण्याची गरज
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात एकेकाळी एकहाती वर्चस्व गाजविणाऱ्या राष्ट्रवादीचा जनाधार गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात घसरला होता. मात्र विधानसभा निवडणुकीने या पक्षाला पुन्हा हात देत एक आमदार निवडून दिला आहे. भोसरीत घड्याळाचे चिन्ह असते तर चित्र वेगळे असते, असे बोलले जात आहे. पिंपरीत यश तर चिंचवड आणि भोसरीत अपयश आले असले तरी जुन्या नव्यांचा मेळ साधत तरुणांच्या हाती पक्षाची सूत्रे दिल्यास तसेच पक्षबांधणी केल्यास महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला यश मिळू शकते, अशी चर्चा रंगली आहे.
पिंपरी-चिंचवड शहर म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असे समीकरण तब्बल 15 वर्षे शहरात होते. राष्ट्रवादीच्या काळात शहराचा विकासही झाला. मात्र अंतर्गत कलह, एकमेकांविरोधात असलेली स्पर्धा तसेच विरोधकांनी उठविलेले भ्रष्टाचाराचे काहूर शमविण्यात राष्ट्रवादीला यश न आल्यामुळे 2014 च्या निवडणुकीत शहरातील तीनही मतदारसंघात अपयश आले होते. त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीतही पक्षाच्या हातून सत्ता गेल्याने राष्ट्रवादी अपयशाच्या गर्तेत अडकली होती. लोकसभेला नवा आणि पवारांच्या घरातील चेहरा देत काही अंशी पक्षात जोश भरण्याचा प्रयत्न झाला मात्र अपयश आले. लोकसभेपूर्वी पक्षबांधणी केली असती तर निकाला काही प्रमाणात का होईना वेगळा लागला असता परंतु, मतदारांना ग्रहीत धरण्याची अजित पवारांची खेळी चुकली.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे विजयी झाल्याने पाच वर्षांनंतर पहिले यश राष्ट्रवादीला मिळाले आहे. भोसरी विधानसभेत ठाम भूमिका घेत पक्षाच्या चिन्हावर विलास लांडे यांना मैदानात उरविले असते तर नक्कीच चित्र वेगळे दिसले असते. पक्षाचा घटलेला जनाधार काही प्रमाणात पुन्हा राष्ट्रवादीकडे वळाल्याचे मतमोजणीनंतर समोर आले आहे. पिंपरी वगळता राष्ट्रवादीची एकसंघ यंत्रणा दिसली नाही. विरोधकांचे चिन्ह चालविण्याचा प्रकारही काहीजणांनी केली. मात्र, मतदारांनी राष्ट्रवादीच्या तसेच राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवारांना भरभरून मते दिली.
सध्या या पक्षाचे महापालिकेत दोन स्विकृतसह 38 नगरसेवक आहेत. महापालिका निवडणुका अडीच वर्षांवर आहेत. विधानसभा निवडणुकीत निर्माण झालेली तरुणांची फळी, नगरसेवकांची असलेली मोठी संख्या तसेच सर्वसामान्य जनतेतून पक्षाला वाढत असलेला जनाधार लक्षात घेऊन पक्षबांधणी केल्यास पक्षाला निश्चितच फायदा होण्याची शक्यता आहे. तरुण नगसेवकांची फळी तयार करून पक्षाची सूत्रे या नगरसेवकांच्या हाती देण्याची गरज व्यक्त होत आहे.
वाघेरेंच्या नेतृत्वाखाली चिंचवड, भोसरीत अपयश
पिंपरी विधानसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसला यश मिळाले असले तरी चिंचवड आणि भोसरीमध्ये मात्र अपयशाचा सामना राष्ट्रवादी कॉंग्रेसला करावा लागला आहे. महापालिका, लोकसभा आणि आत्ता विधानसभा असे सलग तिसरे अपयश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या नावावर नोंदविले गेले आहे. भोसरी व चिंचवडमध्ये उमेदवारांना पुरस्कृत करुन सर्वपक्षीयांना एकत्र आणण्याची खेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली. मात्र, शहराध्यक्ष म्हणून वाघेरे यांना कोणताही करिष्मा दाखविता आला नाही.
…तर महापालिकेत राष्ट्रवादीला यश
सध्या भाजपात असलेले व राष्ट्रवादीचे माजी जेष्ठ नेते आझम पानसरे यांना राष्ट्रवादीने पक्षात घेऊन व्यासपीठावर आणले असते तर भोसरीत त्याचा आणखी फायदा झाला असता. पानसरे यांनी राष्ट्रवादीला शेवटच्या क्षणी पाठिंबा दिल्यामुळे पिंपरीत घड्याळाचा गजर झाला. मात्र पानसरे यांचा पाठिंबा अगोदर मिळविला असता तर चिंचवड आणि भोसरीचे निकाल वेगळे लागले असते. पानसरे यांना पक्षात घेऊन मानाचे स्थान दिल्यास महापालिकेवर सत्ता आणण्यात या पक्षाला यश येऊ शकते.