भोपाळ: मध्य प्रदेश सरकारने एक लाख ८४ हजार शिक्षकांना दिवाळीची भेट दिली असून या शिक्षकांना सातव्या वेतनश्रेणीचा लाभ देण्यात येणार आहे. शनिवारी यासाठी आदेश देण्यात आले आहेत. राज्य शालेय शिक्षणमंत्री प्रभूराम चौधरी यांनी शनिवारी शिक्षकांना सातवा वेतनश्रेणी जाहीर केली. त्याबाबतचे आदेशही देण्यात आले.
जारी केलेल्या आदेशानुसार शिक्षकांना १ जुलै २०१८ पासून सातव्या वेतनश्रेणीचा लाभ मिळणार आहे. कॉंग्रेसने आपल्या वचनपत्रात शिक्षकांना हा लाभ देण्याचे आश्वासन दिले होते. ऑक्टोबर महिन्याच्या पगारामध्ये शिक्षकांना हा लाभ मिळणार आहे.
या नव्या वेतनमानामुळे सहाय्यक शिक्षकांच्या पगारामध्ये पाच, शिक्षकाच्या वेतनात सहा ते सात आणि ज्येष्ठ शिक्षकाच्या वेतनात सात ते आठ हजार वाढ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे सरकारवर दरवर्षी सुमारे दोन हजार कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील सुमारे एक लाख ८४ हजार शिक्षकांना सातव्या वेतनश्रेणीचा लाभ मिळणार आहे.