राष्ट्रवादी- भाजपात चुरस
दौंड- दौंड विधानसभा मतदारसंघात भाजपाकडून आमदार राहुल कुल व राष्ट्रवादीकडून माजी आमदार रमेश थोरात यांच्यातच सरळ लढत होणार आहे.अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 13 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. 4 जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी भीमा पाटस कारखान्याचे उपाध्यक्ष व माजी आमदार काकासाहेब थोरात यांचे पुत्र आनंद थोरात यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेत भाजपात प्रवेश केला आहे.
जनता दलाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेत कुल यांना पाठिंबा दिला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत कुल यांना 87 हजार 649 मते पडली होती. रमेश थोरात यांना 76 हजार 304 मते पडली होती. तिसऱ्या क्रमांकावर मनसेचे राजाभाऊ तांबे यांना 17 हजार मते पडली होती. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बंडखोरी करून शेकापतर्फे मैदानात उतरलेले विकास ताकवणे यांना 5 हजार 560 मते मिळाली होती.
यावेळी 13 उमेदवार दौंडच्या आखाड्यात उतरले आहेत. आनंद थोरात, प्रकाश देशमुख, राजाराम कदम व रवींद्र जाधव या चार उमेदवारांनी माघार घेतली आहे.
दौंड विधानसभेच्या रिंगणातील उमेदवार- किसन बबन हंडाळ (बसपा), रमेश किसनराव थोरात (राष्ट्रवादी), राहुल सुभाष कुल (भाजप), अशोक किसन होले (बहुजन मुक्ती), तात्यासो ताम्हाणे (वंचित) रमेश शितोळे (प्रहार), उमेश म्हेत्रे (अपक्ष), प्रतिक धानोरकर (अपक्ष), प्रल्हाद महाडिक (अपक्ष), महमद शेख (अपक्ष), रमेश किसन थोरात (अपक्ष), लक्ष्मण अंकुश (अपक्ष), संजय कांबळे (अपक्ष).