मावळ तालुक्यात मोठी राजकीय घडामोड
तळेगाव दाभाडे – भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याने नाराज झालेल्या नगरसेवक सुनील शेळके यांना आज नाट्यमय घडामोडीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला. प्रवेशानंतर अगदी काही वेळातच राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी जाहीर केली.
आज अचानकपणे घडलेल्या या घडामोडींमुळे मावळातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यानंतर सुनील शेळके यांनी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. शेळके यांच्या उमेदवारीचे कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून व जल्लोष करीत या निर्णयाचे स्वागत केले.
यानंतर झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबन भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापू भेगडे, तळेगाव नगरपरिषद विरोधी पक्षनेते गणेश खांडगे, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव शिंदे, सुरेश चौधरी, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस संतोष भेगडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन घोटकुले, मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानसभा कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, शिवसेना नेते अनिकेत घुले यांच्यासह राष्ट्रवादी व सुनील शेळके समर्थक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी सुनील शेळके यांच्यासह बापूसाहेब भेगडे, गणेश खांडगे यांना खांद्यावर उचलून घेत जल्लोष केला. तसेच पुष्पवृष्टी करीत फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर सुनील शेळके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे नगरसेवकपदाचा राजीनामा दिला.
भाजपच्या स्वार्थी नेत्यांनी त्रास दिला!
मी, मागील तीन वर्षात खूप सहन केल्याचे सांगत सुनील शेळके म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या काही स्वार्थी नेत्यांनी मला खूप त्रास दिला, अपमान केला, तरीसुध्दा पक्षाबरोबर राहिलो. उमेदवारी द्या म्हणून दारात गेलो, मी उमेदवारी मागत होतो, तरी माझी उमेदवारी डावलली. माझं काय चुकलं ते सांगावं. मी आजही माफी मागायला तयार आहे. मला का डावलले याचा पोलखोल करून दाखवणार असल्याचे शेळके यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
मावळात 25 वर्षानंतर होणार सत्ता परिवर्तन – अजित पवार
सुनील शेळके यांच्या रुपाने मावळात 25 वर्षांनंतर सत्ता परिवर्तन पहायला मिळेल, असा विश्वास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. पवार यांच्या हस्ते मावळचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांना आज दुपारी मुंबईत एबी फॉर्म प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पवार यांनी शेळके यांच्या कार्याचे कौतुक करत राष्ट्रवादीमध्ये स्वागत केले.