अंतिम फेरीनंतरही आरटीईच्या 745 जागा रिक्‍तच

पालकांनी फिरवली पाठ की प्रशासनाचे धोरण कारणीभूत

पिंपरी  – आरटीई मोफत प्रवेशाच्या रखडलेली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी चौथ्या फेरीनंतरही महुर्त लागलेला नाही. चौथी फेरी झाल्यानंतरही 745 जागा रिक्‍त राहिल्या आहेत. त्यामुळे, आरटीई प्रवेशाकडे खरच पालकांनी पाठ फिरवली की, प्रशासनाच्या चालढकल धोरणामुळे जागा रिक्‍त राहणार असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आरटीई (मोफत शिक्षण अधिनियम) अंतर्गत समाजातील अर्थिक दृष्ट्या दुर्बल, मागास प्रवर्ग, दिव्यांग व वंचित घटकांर्तगत येणाऱ्या बालाकांसाठी मोफत शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण हक्क अधिनियम अंतर्गत खाजगी शाळामध्ये 25 टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबवली आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरातील 172 शाळांमधून तीन हजार जागेसाठी यावर्षी आरटीई प्रवेश पक्रिया राबवण्यात आली आहे.

यामध्ये पहिल्या फेरीत 2 हजार 20 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता. त्यानंतर दुसऱ्या तसेच तिसऱ्या फेरीतही अनेकांना प्रवेशाची लॉटरी लागली होती. मात्र, अपेक्षित प्रवेश झाले होते. त्यामुळे, तिसऱ्या फेरीनंतरही शहरातील अनेक जागांवरील प्रवेश रिक्‍त राहिले होते.

तिसऱ्या फेरीनंतर 800 हून अधिक जागा रिक्‍त राहिल्या होत्या. त्यामुळे, चौथ्या फेरीत तरी या जागा भरतील अशी अपेक्षा होती. त्यानुसार चौथ्या फेरीसाठी 9 सप्टेंबर रोजी सोडत काढण्यात आली. या सोडतीमध्ये 206 जणांची नावे जाहीर करण्यात आली होती.

या सोडतीमध्ये नावे आलेल्या विद्यार्थ्यांना 21 सप्टेंबर पर्यंत प्रवेश घ्यावा लागणार होता. मात्र, 21 तारीख उलटल्यानंतरही केवळ 62 विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. तर कागदपत्रांअभावी तीन विद्यार्थ्यांचे अर्ज फेटाळण्यात आले. त्यामळे, चार फेऱ्यानंतरही 745 जागा रिक्‍त राहिल्या आहेत. पाचवी फेरी होईल की याही वर्षी आरटीईच्या जागा रिक्‍त राहणार? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.