पोपटराव गावडे यांचे मत : शिक्रापूर येथे पवार यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन
शिक्रापूर- शिरूर- हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांनी त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. परंतु अलीकडील काळामध्ये शिरूर- हवेलीचा विकास रखडला असून अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पुढील काळात शिरूर- हवेलीचे प्रश्न सोडविण्यासाठी अशोक पवार यांचीच गरज आहे, असे मत माजी आमदार व जिल्हा बॅंकेचे संचालक पोपटराव गावडे यांनी व्यक्त केले.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे माजी आमदार पवार यांच्या शिरूर हवेली मतदारसंघातील कार्य अहवाल सांगणाऱ्या वारसा लोकहिताचा ध्यास नाविन्याचा या पुस्तकाचे प्रकाशन गावडे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी आमदार अशोक पवार, पंचायत समितीच्या उपसभापती जयमाला जकाते, माजी सभापती आरती भुजबळ, माजी उपसभापती मोनिका हरगुडे, बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे, उपसभापती विश्वास ढमढेरे, जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, जिल्हा विचार मंचचे अध्यक्ष सदाशिव पवार, ग्रामपंचायत सदस्या गीता चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस मयूर करंजे, बाजार समितिचे संचालक बाबासाहेब सासवडे, उद्योजक काकासाहेब चव्हाण, संभाजी भुजबळ, हवेली राष्ट्रवादीचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सागर गव्हाणे, बाळासाहेब नरके, सुभाष खैरे, शिवाजी दरेकर उपस्थित होते.
गावडे म्हणाले, शरद पवार यांच्या शिरूर तालुक्याला मोलाची साथ दिलेली आहे. शिरूरचा कायापालट त्यांनी केला आहे. यापूर्वी ज्या ज्या वेळी शरद पवार अडचणीत आले त्यावेळी शिरूर तालुका पवार यांच्या पाठीमागे खंबीर उभा राहिला आहे. आजही शिरूर तालुका पवार यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यावेळी शशिकांत दसगुडे, विश्वास ढमढेरे, कुसुम मांढरे, आरती भुजबळ, दिलीप वाल्हेकर आदींनी मनोगत व्यक्त केले.