सोमेश्वरनगर- सोमेश्वरनगर (ता. बारामती) परिसरात श्री गणरायाचे पारंपरिक पद्धतीने सोमवारी (दि. 2) आगमन झाले असून गेल्या चार दिवसांपासून हा उत्सव परिसरात शांततेत सुरू आहे. यापुढेही विसर्जनापर्यंत हा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी वडगाव निंबाळकर पोलिसांनी गुरुवारी (दि. 5) करंजेपूल व सोमेश्वर कारखाना परिसरात संचलन केले.
करंजेपूल, वडगाव निबाळकर, काऱ्हाटी, पणदरे, सुपा मुख्य पाच गावामध्ये हे संचलन करण्यात आले. या परिसरात अधिकृत 28 गणेश मंडळ आहे. या गणेशोत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये, परिसरात शांतता व सुव्यवस्था राखली जावी, समाजविघातक प्रवृत्तींवर जरब बसून पोलीस यंत्रणेचा धाक निर्माण व्हावा, सामान्य जनतेत पोलिसांप्रती विश्वासाचे वातावरण निर्माण होण्यासाठी या संचलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वडगाव निंबाळकरचे पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिली. या संचलनात पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, आर. एन. साळुंखे, श्रीगणेश कवितके, 28 पोलीस कर्मचारी, 6 होमगार्ड असे एकूण 37 कर्मचारी सहभागी झाले होते.