पुणे – गणेशोत्सव इको फ्रेंडली’ हवा असे म्हणताना केवळ गणेशमूर्ती शाडूची एवढीच कल्पना नाही तर या उत्सवाच्या सजावटीमध्येही कोणत्याही प्रकारच्या प्लॅस्टिकचा वापर केला जाऊ नये हीदेखील संकल्पना आहे. असे असताना अनेक जण 11 दिवस सजावट फ्रेश दिसली पाहिजे यासाठी प्लॅस्टिकची फुले, पाने, थर्माकोल यांचा वापर करताना दिसतात. हल्ली खरी दिसणारी परंतु प्लॅस्टिकची पाने, फुले बाजारात मोठ्या प्रमाणात आणि अतिशय कमी किमतीत उपलब्ध होतात. त्याचाच वापर यासाठी होताना दिसतो.
वास्तविक या गोष्टींचा पुनर्वापर होत नाही आणि ते प्लॅस्टिक असल्याने त्याचे विघटनही होत नाही. त्यातून हा माल मोठ्या प्रमाणात चीनमधून आयात केला जातो. या मालाने अक्षरश: ही सजावटीची बाजारपेठही कॅप्चर’ केली आहे. अशावेळी शक्यतो खऱ्या फुलांचा वापर होणे अत्यंत गरजेचे आहे, त्यातूनच खऱ्या अर्थाने पर्यावरण पूरकतेचा संदेश आपण देऊ शकतो.
अनेक जण पर्यावरणपूरक सजावटीसाठी शक्कल लढवतात. त्यामध्ये सजावटीच्या कागदाचा वापर केला जातो. कागदी फुले, झाडे बनवणे, रद्दी पेपरचा वापर करून मखर बनवणे, कागदी ट्युलिपची फुले बनवणे, काचेचे लोलक, लाकडी काठ्या, कापडाचा वापर करून ते पर्यावरण पूरक कसे करता येईल याचा विचार करता येतो. याशिवाय बाप्पांचे आसन म्हणून लाकडी पाटाचा वापर, नक्षीदार काचेचे झुंबरही वापरता येते. अनेकदा बाप्पांना बसण्यासाठीचे नक्षीदार आसन थर्माकोलमध्ये बनवले जाते. हे करायलाही सोपे असते आणि अत्यंत कमी कालावधीत होते. परंतु या थर्माकोलचा वापर अत्यंत घातक आहे. हा पदार्थ विघटनशील नसल्याने तो पर्यावरणाची सर्वाधिक हानी करणारा आहे.
याचा वापर केल्यानंतर दरवर्षीच ती सजावट नको यासाठी आधी आणलेल्या वस्तू टाकून दिल्या जातात. अक्षरश: त्याचाही कचऱ्यात ढीग होतो. त्याची पुनर्प्रक्रिया करताना अक्षरश: नाकीनऊ येतात. या सगळ्या गोष्टींचा विचार करताना पर्यावरणपूरक गोष्टींचा आधी विचार आणि मग सजावट या गोष्टी प्रत्येकाने लक्षातच ठेवणे आवश्यक आहे.
सजावटीला बक्षीसही…
सजावटीच्या माध्यमातूनही पर्यावरणाचा संदेश देण्याचा अनेकजण प्रयत्न करत असतात. त्यामुळेच सजावट स्पर्धा भरवतानाही हल्ली ती पर्यावरणपूरक असावी अशी खास तळटीपही टाकली जाते. अशा सजावटीला बक्षीसही दिले जाते. अशी आरास करतेवेळी त्याची खास पाहणी करून, कोणत्या पर्यावरणपूरक गोष्टींचा वापर यामध्ये केला आहे ती पाहून बक्षीसही दिले जाते. हादेखील एक मार्ग पर्यावरणसंवर्धनाच्या जागृतीकडे जाणारा आहे.