ऊर्जा वापरामुळे वायू प्रदूषणात वाढ : नागरिकांसाठी धोक्याची घंटा
पुणे – नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक असलेल्या हरित वायू आणि कार्बन उत्सर्जनात वाढ झाली आहे. विजेच्या उपकरणांच्या अतिवापरामुळे हे होत असून त्यामुळे वायू प्रदूषणात भर पडत आहे. वाढत्या हरित वायू आणि कार्बन उत्सर्जनामुळे शहराचे कार्बन फूटप्रिंट वाढत असून नागरिकांसाठी ही धोकादायक बाब असल्याचे स्पष्ट झाले आहे.
इंधनाच्या वापरामुळे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या होणारे कार्बन डायऑक्साईड वायूचे उत्सर्जन म्हणजेच कार्बन फूटप्रिंट आहे. हा कार्बन फूटप्रिंट जितका जास्त तितकी हवेची स्थिती वाईट असल्याचे अभ्यासकांकडून सांगण्यात आले.
पुणे महापालिकेच्या पर्यावरण अहवालातील नोंदीनुसार शहराचे कार्बन फूटप्रिंट सातत्याने वाढत असून त्याचे प्रमुख कारण रहिवासी भागातील इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा अतिवापर आहे. अहवालानुसार, गेल्या चार वर्षांत रहिवासी भागातील ऊर्जेच्या वापरात चारपटीने वाढ झाली असून एकूण हरित वायू उत्सर्जनाच्या 32 टक्के उत्सर्जन हे रहिवासी भागातील ऊर्जेच्या वापरामुळे होत असल्याचे नोंदविण्यात आले आहे. त्यापाठोपाठ 23 टक्के उत्सर्जन हे वाहतुकीमुळे होते.
अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी प्रयत्न
महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख मंगेश दीघे म्हणाले, “शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे ऊर्जेची मागणी आणि वापर यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. परिणामी हरित वायू उत्सर्जन वाढत आहे. पारंपरिक ऊर्जेचा कमीत कमी वापर व्हावा, यासाठी अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यांतर्गत सौरऊर्जेच्या वापरावर अधिकाधिक वापर करण्याला प्रोत्साहन दिले जात आहे. तसेच यासंदर्भात इतर पर्यायांचा अभ्यास सुरू आहे.’