नवी दिल्ली: राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाच्या विरोधात रहिवासी डॉक्टरांनी बेमुदत संपाचा इशार दिला आहे. त्यामुळे दिल्लीतील राममनोहर लोहिया रुग्णालयासह “एम्स’ सारख्य रुग्णालयांसह सरकारी रुग्णालयांमधील वैद्यकीय सेवेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. लाचखोरीचे आरोप असलेल्या “मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’च्या जागेवर “नॅशनल मेडिकल कमिशन’ नेमण्याचे विधेयक गुरुवरी राज्यसभेमध्ये मांडण्यात येणार आहे. या विरोधात निवासी डॉक्टरांनी हा बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.
“बाह्यरुग्ण विभाग, आपत्कालीन आणि अतिदक्षता विभागातील सर्व डॉक्टर गुरुवारी आपले काम करणार नाहीत. जर वादग्रस्त विधेयक राज्यसभेमध्ये मांडले गेले तर डॉक्टरांचा संप बेमुदत सुरू राहिल.’ असे निवासी डॉक्टरांची संघटना “फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन’चे अध्यक्ष डॉ. सुमेध संदाशिव यांनी सांगितले. “एम्स’मधील “रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन’ने या प्रस्तावित संपाची नोटीस प्रशासनाला दिली आहे.