#ENGvsAUS : ऍशेसही घेण्याचा इंग्लंडचा निर्धार

पराभवाची मालिका ऑस्ट्रेलिया खंडित करणार?

स्थळ – एजबॅस्टन मैदान
वेळ – दु. 2.30 पासून (भारतीय वेळेनुसार)

बर्मिंगहॅम – ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यातील ऍशेस क्रिकेट मालिका नेहमीच चुरशीने खेळली जाते. दोन्ही संघांसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या या मालिकेस येथे आजपासून प्रारंभ होत आहे. विश्‍वचषकाचे स्वप्न साकार केल्यानंतर आता ही मालिकाही जिंकण्याचा निर्धार इंग्लंडच्या खेळाडूंनी केला आहे. तरीही बलाढ्य कांगारूविरुद्ध हे यश मिळविणे सोपे नाही.

मर्यादित षटकांच्या स्पर्धेत प्रथमच इंग्लंडने विश्‍वविजेतेपद मिळविले आणि तेही घरच्या मैदानावर. त्यामुळे त्यांचा आत्मविश्‍वास उंचावला आहे. त्यातच ऍशेस मालिका घरच्या मैदानावर होत असल्यामुळे त्याचाही फायदा त्यांना मिळणार आहे. तरीही ऑस्ट्रेलियन खेळाडू नेहमीच जिद्दीने व क्षमतेच्या शंभर टक्‍के कामगिरी करीत खेळतात. त्यांच्याकडून प्रत्येक सामन्यात चांगली झुंज पाहावयास मिळणार आहे.

विश्‍वचषक जिंकणाऱ्या संघातील काही खेळाडूंचा समावेश असलेल्या इंग्लंडला नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यात आयर्लंडने 85 धावांत गुंडाळले होते. जरी त्यानंतर इंग्लंडने या सामन्यात डाव पलटविला असला तरी या धक्‍क्‍यातून सावरण्यासाठी त्यांना वेळ लागणार आहे. या सामन्यापासून त्यांचे फलंदाजांनी बोध घेतला आहे व आज त्या चुकांची पुनरावृत्ती त्यांच्याकडून होणार नाही अशी अपेक्षा आहे. विश्‍वचषकाचे मानकरी असलेल्या बेन स्टोक्‍स, जेसन रॉय, जोस बटलर व जॉनी बेअरस्टो यांच्यावार त्यांची भिस्त आहे. जोफ्रा आर्चर, ख्रिस व्होक्‍स, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन यांच्याकडून प्रभावी गोलंदाजीची अपेक्षा आहे.

जेम्स पॅटिन्सन, पॅट्रिक कमिन्स व मिचेल स्टार्क यांच्यावर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीची जबाबदारी आहे. विश्‍वचषक स्पर्धेत सातत्याने धावांचा पाऊस पाडणारा डेव्हिड वॉर्नर हा त्यांच्या फलंदाजीचा मोठा आधारस्तंभ आहे. त्याच्याबरोबरच स्टीव्ह स्मिथ, उस्मान ख्वाजा, टीम पायने यांच्याकडूनही त्यांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियास गेल्या 19 वर्षांमध्ये इंग्लंडमध्ये ऍशेस जिंकता आलेल्या नाहीत. ही अपयशाची मालिका खंडित करण्यासाठी त्यांना सर्वोच्च कौशल्य दाखवावे लागणार आहे.

संघइंग्लंड – जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्‍स (उपकर्णधार), जेसन रॉय, जो डेन्ली, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), रोरी बर्नस, मोईन अली, ऑली स्टोन्स, जोस बटलर, जोफ्रा आर्चर, ख्रिस व्होक्‍स, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन, सॅम क्‍युरन.

ऑस्ट्रेलिया– टीम पायने (कर्णधार व यष्टीरक्षक), कॅमेरून बॅन्क्रॉफ्ट, पॅट्रिक कमिन्स, मार्कोस हॅरीस, जोश हॅझेलवुड, ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नुस लॅबुशाग्ने, नाथन लियान, मिचेल मार्श, मिचेल नेसेर, जेम्स पॅटिन्सन, पीटर सिडल, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.