नवी दिल्ली – जून महिन्यानंतर किरकोळ आणि घाऊक महागाई वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सरकारची तूट वाढू शकते. या कारणामुळे जून महिन्यानंतर व्याजदर कपातीसाठी कमी वाव राहणार आहे. त्यामुळे जून महिन्यातील पतधोरणात रिझर्व्ह बॅंक व्याजदरात कपात करू शकते असे एच एस मार्किट या संस्थेने म्हटले आहे.
या संस्थेने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, ही व्याजदर कपात पाव टक्क्याची असू शकते. फेब्रुवारी आणि एप्रिलमधील पतधोरणातही रिझर्व्ह बॅंकेने आपल्या रेपो या मुख्य व्याजदरात पाव टक्का कपात केली होती. जून महिन्यानंतर मात्र रिझर्व्ह बॅंक या दरात कपात करणार नाही, असे या संस्थेला वाटते. देशातील आणि परदेशातील चलनवाढ वाढण्याची शक्यता आहे. बॅंकेने ठरविलेल्या दरापेक्षा चलनवाढ जास्त होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे जूननंतर व्याजदर कपातीसाठी वाव असणार नाही. दरम्यानच्या काळात अमेरिकेने इराणसोबत संघर्ष निर्माण केलेला आहे. इराणकडून भारताला आता तेल विकत घेता येणार नाही. त्याचबरोबर अमेरिकेने भारताला स्वस्तात तेल देण्यास नकार दिलेला आहे. यामुळे जागतिक पातळीवर क्रूडचे दर वाढू शकतात. तसे झाले तर भारताला त्यासाठी अधिक परकीय चलन मोजावे लागेल. त्याचबरोबर भारतातील इंधनाच्या किमती वाढून त्यामुळे महागाई वाढू शकते. त्यामुळे जून महिन्यात जाहीर होणाऱ्या पत धोरणात रिझर्व्ह बॅंक शेवटची व्याजदर कपात करू शकते, असे या संस्थेच्या अहवालात म्हटले आहे.
त्याचबरोबर बॅंकेचे पावसाकडेही लक्ष राहणार आहे.एकूण सर्व परिस्थिती पाहता आगामी काळात महागाईचा दर पाच टक्क्यांच्या पुढे जाऊ शकतो. सरलेल्या वर्षात सर्वसाधारणपणे महागाईचा दर 4.2 टक्के होता.