पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात राज्यातील पहिले मॉडेल लसीकरण केंद्र स्थापन होणार आहे. लसीकरण केंद्र पुढील महिन्यापासून कार्यान्वित होणार आहे. या रुग्णालयात लसीकरणापूर्वी, लसीकरणादरम्यान आणि नंतरच्या आवश्यक सुविधा उपलब्ध असणार आहे, अशी माहिती माहापालिका आरोग्य विभागाने दिली.
साथीच्या सहकार्याने यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट यांच्या सहकार्याने राज्यातील एकमेव केंद्र हे पुण्यातील कमला नेहरु रुग्णालयात सुरु करण्यात येणार आहे. एमआरआयटीई प्रकल्पांतर्गत राज्यातील १९ जिल्ह्यांना कोविड-१९ महामारी दरम्यान लसीकरणासाठी मदत मिळाली आहे.
आतापर्यंत महापालिकेने नऊ महिन्यांपर्यंतच्या मुलांचे १०० टक्के आणि दीड वर्षापर्यंतच्या मुलांचे ९५ टक्के लसीकरण केले आहे. मॉडेल केंद्राच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी आरोग्य प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. ही समिती नियमितपणे केंद्राची पाहणी करून मासिक अहवाल तयार करणार आहे.
याबाबत महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार यांनी सांगितले की, नियमित लसीकरण केंद्रांमध्ये लसींचा नियमित पुरवठा केला जातो. मॉडेल लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण सेवेसाठी समर्पित क्षेत्र, शीतसाखळी व्यवस्थापन, लसीकरणापूर्वी आणि लसीकरणानंतर स्वतंत्र प्रतीक्षा क्षेत्र, स्तनपान क्षेत्र आणि लाभार्थ्यांची अडचण टाळण्यासाठी काळजी घेतली असल्यामुळे रुग्णांचा प्रतीक्षा वेळ कमी होणार आहे.